भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने घणाघाती आरोप केल्यानंतर बीसीसीआयने, शमीचा वार्षिक करार राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कसोटी संघात शमी प्रमुख गोलंदाज अशी भूमिका बजावत असतानाही, बीसीसीआयने आज जाहीर केलेल्या २६ खेळाडूंच्या यादीत शमीचं नाव समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये.

अवश्य वाचा – मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध; पत्नीकडून फेसबुकवर पोलखोल

मोहम्मद शमीच्या वैयक्तीक आयुष्याबद्द ज्या काही बातम्या आज समोर आल्या आहेत त्याची आम्ही नोंद घेतली आहे. हा शमीचा खासगी प्रश्न असल्यामुळे बीसीसीआय यात लक्ष घालणार नाही. मात्र या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिस अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने आम्ही शमीचा वार्षिक करार राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. एक खेळाडू म्हणून शमीच्या गुणवत्तेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर या घटनेचा परिणाम व्हायला नको म्हणून शमीचं नाव सध्या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं नसल्याचंही, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

अवश्य वाचा – क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयची नवीन आर्थिक करार यादी जाहीर

मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्याची पत्नी हसिन जहाँने केला आहे. फेसबुकवर तिने मोहम्मद शमीचे तरुणींसोबतच व्हॉट्स अॅपवरील चॅटचे स्क्रीनशॉटही अपलोड केले आहेत. या पोस्टने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये शमीच्या पत्नीने, नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप केला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यावर शमीने मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी देखील दिली, असा आरोपही तिने केला आहे. मात्र शमीने यावर सावध प्रतिक्रीया देत या प्रकरणी आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलं आहे.