भारताचा शैलीदार डावखुरा फलंदाज युवराज सिंग कर्करोगातून बरा झाला असून आता क्रिकेटच्या मैदानातही त्याने दमदार कामगिरी करायलाही सुरुवात केली, पण दुसरीकडे त्याचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांना घशाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यूयॉर्कमधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळी त्यांच्या घशातील गाठ काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. काही दिवसांपूर्वी योगराज सिंग यांना बोलताना आणि श्वास घेताना त्रास होत होता, त्यानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये योगराज यांना कर्करोग असल्याचे समजले होते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना अमेरिकेत उपचार घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबत योगराज यांच्या पत्नी सतवीर कौर यांनी सांगितले की, ‘‘घसा दुखत असल्याचे आणि कफ होत असल्याची तक्रार ते करत होते, पण नेमके काय घडले याची त्यांना कल्पना नव्हती. काही दिवस त्यांनी गोळ्या घेतल्या आणि त्यांना काही काळ बरे वाटले. पण जेव्हा त्यांना समस्या जास्त वाटू लागली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले आणि आम्ही काही चाचण्या केल्या.’’
योगराज यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ते यामधून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये युवराजने केमोथेरपी केली होती, तेच हॉस्पिटल युवराज आणि डॉक्टरांनीही त्यांना सुचवले होते. त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
सतवीर यांनी पुढे सांगितले की, ‘‘२० दिवसांपूर्वीच त्यांच्या घशातील गाठ काढण्यात आली आहे आणि यामधून ते सावरत आहेत. जोपर्यंत यामधून पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत न बोलण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.’’
योगराज आणि युवराज वेगळे राहत असले तरी ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. युवराजने त्यांच्याशी याबाबतीत संपर्क साधला आहे. याबाबत युवराजची आई आणि योगराज यांची पहिली पत्नी शबनम सिंग यांनी याबाबत सांगितले की, ‘‘त्यांच्यावरील उपचार झाल्यावर ते भारतात परतणार आहेत. माझे त्यांच्याशी कोणतेही बोलणे झालेले नाही, पण युवराजचा त्यांच्याशी संपर्क झाला आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच आम्हाला आशा आहे.’’