ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ व्यवस्थापन शिखर धवनचा सलामीचा साथीदार म्हणून मयांक अगरवाल किंवा शुभमन गिल यांच्यापैकी एकाची निवड करण्याची शक्यता आहे.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील उपकर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत धवनला सलामीचा साथीदार देण्याचे आव्हान भारतापुढे आहे. आठ महिन्यांपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळला. त्या मालिकेत भारताने ०-३ अशी हार पत्करली. त्यावेळी मयांकवर सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु तो अपयशी ठरला होता. मात्र तरीही त्याच्यावर पुन्हा विश्वास टाकला जाऊ शकतो. याशिवाय सिडनी क्रिकेट ग्राऊंडची खेळपट्टी पाहिल्यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीने शुभमनशी चर्चा केली.

नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या शुभमनने एकूण ४४० धावा केल्या, तर मयांकने एकूण ४१८ धावा केल्या. यष्टिरक्षक-फलंदाज के. एल. राहुल हा सलामीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे.