ऋषिकेश बामणे

वयचोरी आणि क्रीडा स्पर्धा यांचे एक अतूट नाते आहे. जितका जुना आणि लोकप्रिय खेळ तितकीच अधिक वयचोरीची प्रकरणे. त्यातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वयचोरीच्या कबुलीला माफी देण्याचा नियम घोषित केल्यामुळे वयचोरीची आणखी काही उदाहरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचप्रमाणे अखिल भारतीय टेनिस महासंघाने सर्व प्रकारच्या टेनिसपटूंच्या वय पडताळणीसाठी टॅनर व्हाइटहाऊस-३ म्हणजेच ‘टीडब्ल्यू-३’ चाचणीचा अवलंब करण्याचे जाहीर केले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)‘टीडब्ल्यू-३’ चाचणीविषयी अनिश्चितता व्यक्त केली आहे. मात्र ‘बीसीसीआय’बरोबरच अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) खेळाडूंना या चाचणीला सामोरे जाण्यास सांगू शकतात. तसेच राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनीही वयचोरी करणाऱ्या बॅडमिंटनपटूंवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी यापूर्वीच केली होती. त्याच पार्श्वभूमीवर वयचोरीच्या भ्रष्टाचाराचा आणि त्यावरील उपायांचा हा धांडोळा-

वयचोरी कशी होते?

जन्मतारखेच्या दाखल्याचा वयचोरीसाठी मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात येतो. काही जण जन्म झाल्यानंतर दोन अथवा तीन वर्षांनी जन्मतारखेचा दाखले बनवतात, त्यामुळे त्यांचे वय आपसुकच लपले जाते. त्याशिवाय या दाखल्यात फेरफार करता येणे शक्य असल्याने फक्त जन्मतारखेच्या पुराव्यावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. लाचलुचपतीच्या सहाय्याने चाचण्यांच्या निकालातही बदल केल्यामुळे खेळाडू वयचोरी करतो. शरीरयष्टीत बदल करूनही वय लपवता येते. दाढी-मिशा काढून तसेच वजन कमी करून आपल्या वयापेक्षा खालच्या वयोगटात खेळून खेळाडू वयचोरी करतात.

वयचोरी पडताळणाऱ्या प्रमुख चाचण्या टॅनर व्हाइटहाऊस-३ (टीडब्ल्यू-३)

‘टीडब्ल्यू-३’ ही चाचणी खेळाडूच्या हाडांची तपासणी करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. परंतु खेळाडूचे नेमके वय दर्शवण्यात ही चाचणी अपयशी ठरते. यामध्ये खेळाडूच्या डाव्या हाताची आणि मनगटाची क्ष-किरणांद्वारे चाचणी केली जाते. जर खेळाडू डावखुरा असेल तर त्याच्या उजव्या हाताची चाचणी करण्यात येते. जर एका १८ वर्षांच्या खेळाडूने ही चाचणी केली, तर चाचणीच्या अहवालानुसार त्याचे वय १७ ते १९ दरम्यान आहे, असे दिसून येते. त्यामुळे तो खेळाडू नेमका किती वयाचा आहे, हे मात्र स्पष्ट होत नाही. साधारणपणे २-३ हजारांपर्यंतचा खर्च या चाचणीसाठी येतो.

एपिजेनेटिक क्लॉक

या चाचणीसाठी किमान १५ हजार रुपये मोजावे लागतात. खेळाडूच्या डीएनए यासाठी आढावा घेतला जातो. त्याची उंची, हाडांची बळकटी यांसारख्या बाबींवर ही चाचणी कार्य करते. परंतु खात्रीने खेळाडूचे वय दर्शवण्यात ही चाचणी कमी पडते. तसेच आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्यांना या चाचणीचा खर्च परवडत नाही.

एफइएलएस (फेल्स)

टीडब्ल्यू-३ प्रमाणेच ‘फेल्स’ चाचणीतही क्ष-किरणांच्या सहाय्याने खेळाडूच्या हाडांची तपासणी केली जाते. किमान २-३ हजारांच्या आसपास या चाचणीसाठी मोजावे लागतात. यामध्ये खेळाडूच्या रक्ताचे नमुनेसुद्धा गोळा केले जातात.

नेमके वय सांगणारी चाचणी हवी!

नेमके वय दर्शवू शकणाऱ्या चाचणीचे संशोधन अद्यापही झालेले नाही. त्यामुळे खेळाडू वयचोरी करण्यात यशस्वी होतात, असे फिजिओथेरेपिस्ट निखिल लाटे यांनी सांगितले. ‘‘क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांतही वयचोरीचे दाखले मोठय़ा प्रमाणावर पहायवास मिळतात. अनेकदा खेळाडूचे पालक आणि प्रशिक्षक वयचोरीसाठी मुख्य जबाबदार असतात. जन्मतारखेच्या दाखल्यापासून ते खेळाडूंच्या शरीरयष्टीतील बदलांनुसार वयचोरी करता येते. परंतु दुर्दैवाने खेळाडूचे नेमके वय सांगू शकणारी अद्याप एकही चाचणी नसल्याने एखाद्या कौशल्यवान खेळाडूच्या प्रगतीला खिळ बसते,’’ असे लाटे म्हणाले.

वय पडताळणीसाठी स्वतंत्र समिती नेमावी!

वयचोरीला आळा घालण्यासाठी विविध वयोगटातील स्पर्धासाठी स्वतंत्र समिती नेमावी, असे मत डॉ. लवेश जाधव यांनी व्यक्त केले. ‘‘टीडब्ल्यू-३ चाचणीत आढळलेल्यांना ‘एमआरआय’ करण्यास सांगून या समितीने त्या अहवालाची तपासणी करावी. पालकांनीही खेळाडूंना यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. ‘एमसीए’ बरोबरच अन्य क्रिकेट संघटनांनी सर्वोत्तम ५० खेळाडूंची यादी बनवून त्यांना ‘टीडब्ल्यू-३’ तसेच एमआरआय या दोन्ही चाचण्या करणे अनिवार्य केल्यास क्रिकेटमधील वयचोरीचे प्रमाण नक्कीच कमी होईल,’’ असे  जाधव म्हणाले.

‘बीसीसीआय’च्या निर्णयाबाबत मतमतांतरे

वयचोरीबाबत ‘बीसीसीआय’ने लागू केलेला नवा नियम काहीसा विचित्र वाटतो. कोणताही खेळाडू समोरून क्वचितच त्याने वयचोरी केल्याचे कबूल करेल आणि जरी त्याने मान्य केले तरी पुढे त्याच्यावरील वयचोरीचा ठपका कायमस्वरुपी राहील. वयचोरी रोखण्यासाठी त्याच्या मुळावर घाव करणे गरजेचे आहे. परप्रांतातून मुंबईत येणाऱ्या खेळाडूंमध्ये वयचोरीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आढळते. एकदा या खेळाडूंनी वयाची १९ वर्षे पूर्ण केली, की मग पकडले जाण्याची भीती त्यांच्या मनातून नाहीशी होते. प्रशिक्षकांचीही यामध्ये मोलाची भूमिका असते. त्यामुळे वयचोरी करणाऱ्या खेळाडूबरोबरच प्रशिक्षकाचेही पितळ प्रसार माध्यमांसमोर उघडे पाडणे आवश्यक आहे.

– सुलक्षण कुलकर्णी, क्रिकेट प्रशिक्षक

शालेय क्रिकेटमध्ये सर्रास वयचोरी केली जाते, असा आरोप नेहमीच लावण्यात येतो. परंतु गेल्या तीन वर्षांत किमान मुंबईतील शालेय क्रिकेट स्पर्धात वयचोरीचे एकही प्रकरण आढळलेले नाही. खेळाडूंची नावनोंदणी करतानाच त्यांचे मूळ आधार कार्ड आणि आई अथवा वडीलांपैकी एकाचे पॅन कार्ड आम्ही तपासतो. त्याशिवाय हाडांची चाचणी करणे आम्ही अनिवार्य केली असून खेळाडूच्या शरीरयष्टीकडे पाहून किंचीतही संशय आल्यास आम्ही अधिक खबरदारी बाळगतो. वयचोरीचा गुन्हा केल्याची कबुली भविष्यातही कोणी देईल, असे वाटत नाही. त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) वयचोरीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

– नदीम मेमन, ‘एमसीए’च्या कार्यकारिणी समितीचे सदस्य