‘युरोप क्रिकेट लीग’मध्ये अहमद नबी या फलंदाजाने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या २८ चेंडूमध्ये शतक झळकावले आहे. अहमद नबीनं १४ षटकारांची आतषबाजी करत ३० चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी केली. ड्रॅक्स क्रिकेट क्लबकडून खेळाताना नबीनं हा कारनामा केला.

अहमद नबीच्या शतकी खेळीच्या बळावर ड्रॅक्स क्रिकेट क्लबने निर्धारित दहा षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या क्लज क्रिकेट क्लबला दहा षटकांत पाच बाद ६९ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना ड्रॅक्स क्रिकेट क्लबने ९५ धावांनी जिंकला. तडाखेबाज फलंदाजी केल्यामुळे नबीला सामनाविराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

टी-१० क्रिकेटला अद्याप आयसीसीने मान्यता दिलेली नाही मात्र सध्या या फॉरमॅटची सध्या बरीच चर्चा आहे. युवराज आणि ख्रिस गेल सारखे दिग्गज फलंदाजही टी-१० क्रिकेटमध्ये सामिल झाले आहेत. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक विंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. २०१३ मध्ये गेलने ३० चेंडूत शतक झळकावले होते. गतवर्षी क्लब क्रिकेटमधील एका सामन्यात भारताच्या वृद्धीमान साहाने फक्त २० चेंडूत शतक झळकावले होते.