अहमदनगर जिल्ह्य़ातील खो-खो संघातील कार्तिक हरदास (१३) या खेळाडूचा रविवारी रात्री ठाण्यामध्ये एका अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. ठाणे महापालिका आयोजित कला-क्रीडा महोत्सवामधील खो-खो स्पर्धेकरिता तो त्याच्या संघासोबत ठाण्यात आला होता. रात्रीच्या जेवणानंतर संघासोबत तो आईस्क्रीम खायला जाण्यासाठी घोडबंदर भागातील रस्ता ओलांडत होता, त्यावेळी भरधाव कारच्या धडकेमुळे हा अपघात झाला. या घटनेनंतर महापालिकेने कार्तिकच्या कुटूंबियांना एक लाखांची मदत जाहीर केली आहे.
ठाणे महापालिकेने कला-क्रीडा महोत्सव आयोजित केला असून या महोत्सवाचे रविवारी सायंकाळी दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवानिमित्ताने राज्यातील विविध जिल्ह्य़ातील संघ ठाण्यात आले असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्य़ातील खो-खो संघाचाही समावेश आहे. या संघात कार्तिक हरदास होता. महापालिकेने या संघातील खेळाडूच्या राहण्याची व्यवस्था घोडबंदर येथील दोस्ती एम्पोरिया येथे केली होती. तसेच महापालिकेने त्यांच्या वाहतूकीसाठी बसची व्यवस्था केली होती. महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर या संघातील १२ खेळाडूंना बसमधून दोस्ती एम्पोरिया येथे सोडण्यात आले. यानंतर रात्रीचे जेवण झाल्यानंतर संघातील खेळाडू आईस्क्रीम खाण्यासाठी घोडबंदर भागात गेले होते. तेथून आईस्क्रिम खाऊन घरी परण्यासाठी रस्ता ओलांडत असतानाच कार्तिकला एका भरधाव कारने धडक दिली यात जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तो नगर जिल्ह्य़ातील शेवगाव नेवाळीचा रहिवाशी होता. या अपघाताप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात अनोळखी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील स्पर्धामध्ये कार्तिकला श्रद्धांजली अपर्ण करण्याचा तसेच त्याच्या कुटुंबीयांना एक लाखांची मदत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.