२०२१ सालात इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामन्याचा मान अहमदाबादला मिळणार असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने दिली आहे. जानेवारी ते मार्च या काळात इंग्लंडचा संघ भारतात ५ कसोटी सामने आणि मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. कोलकाता प्रेस क्लबच्या कार्यक्रमात बोलत असताना सौरव गांगुलीने याबद्दल माहिती दिली.

सध्या देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन युएईत केलं. खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने इंग्लंडचा दौरा देखील युएईत आयोजित करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. परंतू इंग्लंड दौऱ्यासाठी पहिलं प्राधान्य आता भारतच असणार आहे. यासाठी बीसीसीआयने Bio Secure Bubble तयार करण्याचाही विचार केला आहे. कसोटी मालिकेसाठी अहमदाबाद, धर्मशाळा आणि कोलकाता अशा ३ ठिकाणांबद्दल विचार झालेला असून अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याचं गांगुलीने सांगितलं.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाचव्या स्थानासाठी शार्दुल ठाकूर-मोहम्मद सिराजमध्ये शर्यत

इंग्लंड दौऱ्याचं आयोजन करण्याआधी भारतीय संघ आयपीएलचा तेरावा हंगाम संपला की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. येत्या काही काळात बीसीसीआयची निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड करणार आहे.