तिसऱ्या कसोटीला मुकणार

रांची : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडीन मार्करमने नैराश्याच्या भरात मारलेल्या जोरदार ठोशामुळे त्याच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला तो मुकणार आहे.

‘‘पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात बाद झाल्यानंतर स्वत:च्या कामगिरीवर नाराज झालेल्या सलामीवीर मार्करमने जोरदार प्रहार टणक भागावर केला. त्यामुळे त्याच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली असून, तो तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही,’’ असे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने म्हटले आहे.

विशाखापट्टणम आणि पुण्यातील दोन कसोटी सामन्यांत मोठय़ा फरकाने पराभव पत्करल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने आधीच मालिका गमावली आहे. मार्करम या दौऱ्यात फारसा यशस्वी ठरलेला नाही. सराव सामन्यात दोन शतके झळकावणाऱ्या मार्करमने पहिल्या कसोटीत अनुक्रमे ५ आणि ३९ धावा केल्या, तर दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावांत त्याला भोपळाही फोडता आला नाही.

मार्करमच्या वैद्यकीय अहवालानुसार त्याच्या मनगटाला फ्रॅक्चर झालेले आहे. त्यामुळेच तिसऱ्या कसोटीत त्याला खेळता येणार नाही. पुढील उपचारासाठी त्याला दक्षिण आफ्रिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे संघाचे डॉक्टर हशेंद्र रामजी यांनी सांगितले. तिसरी कसोटी शनिवारपासून सुरू होत असून, मार्करमच्या जागी अद्याप बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.

माझ्याकडून काय चूक घडली, त्याची मला पूर्णत: जाणीव आहे. या घटनेमुळे मायदेशी परतावे लागत असल्याचे अत्यंत दु:ख होत आहे. कामगिरी खालावल्यामुळे माझे स्वत:वरील नियंत्रण सुटले. खेळात बऱ्याचदा भावनांचा उद्रेक होतो आणि क्वचित प्रसंगी नैराश्य येते. परंतु ही चूक क्षमा करण्याजोगी नाही. मी या घटनेबद्दल संघाची आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांची माफी मागतो.

– एडीन मार्करम