मुंबई : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. जकार्तामध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून फुटबॉलला वगळण्याचा निर्णय घेणाऱ्या ऑलिम्पिक संघटनेवर रोष व्यक्त करण्यात आला.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या महिन्याच्या प्रारंभी झालेल्या बैठकीत येत्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष किंवा महिला संघाला जेतेपदाची संधी नसल्याने दोन्ही संघांना आशियाई स्पर्धेतील प्रवेशास नकार दर्शवला होता. त्यावर फुटबॉल महासंघाच्या बैठकीत पडसाद उमटले.

माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अभिषेक यादव यांची समितीवर नियुक्ती करण्यात आली. त्याशिवाय अंजली शाह यांची समितीवरील दुसऱ्या महिला सदस्या म्हणून नेमणूक करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. या बैठकीप्रसंगी फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सरचिटणीस कौशल दास, उपाध्यक्ष सुब्रतो दत्ता यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. फुटबॉल घटनेतील आदर्श बदलानुसार हे बदल करण्यात आले आहेत. तसेच सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धा बांगलादेशमध्ये घेण्याच्या निर्णयास महासंघाच्या बैठकीत सहमती दर्शवण्यात आली. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘टीडब्ल्यू३’ ही वयचोरी रोखणारी चाचणी सर्व स्तरांवर बंधनकारक करण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला. तसेच फिफाच्या निर्देशानुसार २३ वर्षांखालील सर्व स्पर्धामध्ये प्रत्येक सामन्यात पाच बदली खेळाडू खेळवण्यासह सामना अतिरिक्त वेळेत गेल्यास अजून एक बदल संघात करू देण्याची मुभा देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.