इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या अंतिम सामन्यात चेन्नईयन क्लबच्या खेळाडूंना धक्काबुक्की केल्याबद्दल गोवा फुटबॉल क्लबवर कारवाई होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीची पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय दिला जाईल.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात गोवा संघाला २-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता. सामना संपल्यानंतर गोव्याच्या खेळाडूंनी व सहयोगींनी चेन्नईयन खेळाडूंना धक्काबुक्की केल्याचा तसेच सामन्यातील तीन जपानी पंचांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गोवा क्लबवर करण्यात आला आहे. सामनाधिकारी ए. के. मामुकोया यांनी याबाबत एआयएफएफला अहवाल सादर केला असून, गोवा संघावर कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

‘‘गोवा क्लबचे साधनसामग्री व्यवस्थापक राजेश मळगी यांच्यासह सहयोगी व काही राखीव खेळाडूंनी मैदानावर धाव घेत पंचांना घेराव घातला. पंचांना मारण्याची धमकी दिली. हे पाहून मी मैदानाकडे धाव घेतली. त्या वेळी गोव्याचे पदाधिकारी व खेळाडूंकडून पंचांना शिवीगाळ केली जात होती,’’ असे मामुकोया यांनी सांगितले.

‘‘चेन्नईयन क्लबचा महत्त्वाचा खेळाडू एलाना ब्लुमरने मलाच ढोपराच्या साहाय्याने ढकलले व मान धरली. परंतु मामुकोया यांनी हा आरोप फेटाळला आहे. त्यांनी म्हटले आहे, की ब्लुमरलाच धक्काबुक्की होत असल्याचे मी पाहिले आहे. त्यामुळेच गोवा संघावर कडक कारवाई करण्याची मी शिफारस करीत आहे,’’ असा दावा गोवा क्लबचा एक भागीदार दत्तात्रय साळगावकर यांनी केला आहे.