पहिल्या कसोटीत जशास तसे उत्तर देत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला कसोटी अनिर्णित करणे भाग पाडले. आफ्रिकेच्या तोफखान्याला सक्षमपणे तोंड देणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कला रोखण्याचे मनसुबे आफ्रिकन संघाने आखले आहेत.
पहिल्या कसोटीत आफ्रिकेच्या साडेचारशे धावांसमोर खेळताना ऑस्ट्रेलियाची ३ बाद ४० अशी अवस्था झाली होती, मात्र त्यानंतर मायकेल क्लार्कने शानदार द्विशतकासह संघाला साडेपाचशेचा टप्पा ओलांडून दिला. यानंतर आफ्रिकेने कसोटी अनिर्णित राखली.
अ‍ॅडलेडमध्ये गोलंदाजांची कामगिरी चांगली होईल, असा विश्वास असल्याचे आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथने सांगितले.
फलंदाजांनी रचलेल्या धावांचा बचाव करण्यात आम्ही अपयशी ठरलो, अशी कबुली स्मिथने दिली. मात्र पहिल्या कसोटीत झालेल्या चुका टाळून नव्या ऊर्जेने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी गोलंदाजांनी कसून सराव केल्याचेही स्मिथने सांगितले. जबरदस्त फॉर्मात असलेल्या मायकेल क्लार्कला रोखण्यासाठी आखूड टप्प्याच्या चेंडूचा सढळ हस्ते वापर करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. पदार्पणात चांगली कामगिरी करू न शकलेल्या रॉरी क्लेनवेल्हडटच्या जागी फिरकीपटू इम्रान ताहीरला संघात समाविष्ट करण्याचे संकेतही स्मिथने दिले आहेत.