भारतीय हॉकी संघास यंदा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार असून त्यामध्ये आम्ही चांगली कामगिरी करून दाखवू असे भारतीय संघाचा कर्णधार सरदारासिंग याने येथे सांगितले.  जागतिक लीगला दहा जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या लीगसाठी निवड झालेल्या भारतीय संघात अनेक युवा व नवोदित खेळाडूंचा समावेश असला, तरी आमचे खेळाडू अव्वल दर्जाचे यश मिळवतील अशी खात्री व्यक्त करीत सरदारासिंग म्हणाला, आमच्या संघातील अनेक युवा खेळाडू जागतिक स्तरावरील स्पर्धाबाबत विविध तंत्र आत्मसात करीत आहेत. जागतिक लीगसाठी आम्ही चांगली तयारी केली आहे. पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याचे आमचे ध्येय असून त्याकरिता झगडण्याची आमची तयारी आहे. यंदा आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, विश्वचषक स्पर्धाचा समावेश आहे. या स्पर्धामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही नियोजनपूर्वक सराव करणार आहोत. भारताचा सलामीचा सामना इंग्लंडशी होणार आहे.