नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ नोव्हेंबरला ट्वेंन्टी २० मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.

मात्र, या सामन्यात दिल्लीतील वायू प्रदूषणाचा अडथळा निर्माण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये श्रीलंके च्या खेळाडूंना फिरोजशाह कोटला मैदानावर कसोटी सामन्यात दिल्लीतील प्रदूषणामुळे अडचणी आल्या होत्या. या सामन्यादरम्यान कित्येक खेळाडूंनी मास्क घालून खेळणे पसंत केले होते. मात्र, त्यानंतरही काही खेळाडू आजारी

पडले होते.बीसीसीआयचे रोटेशन धोरण आणि बांगलादेश संघाच्या दौऱ्याचा कार्यक्रम पाहता पहिला ट्वेंन्टी २० सामना दिल्ली येथे डे-नाईट असा खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याआधीच दिल्ली शहरात खराब वातावरण हा चिंतेचा विषय बनला आहे. दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी वायू गुणवत्ता सूचकांक (एक्यूआय) खराब दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी दिल्ली विद्यापीठाचा एक्यूआय ३५७ होता. हा एक्यूआय अतिशय खराब मानला जातो.खराब वायू प्रदूषणावर आमचे नियंत्रण नाही आणि सामना दिवाळीच्या एक आठवडय़ानंतर असता तर तेव्हापर्यंत स्थिती नियंत्रणात आली असती. आम्हाला दिवाळीनंतर दिल्लीच्या प्रदूषणाची कल्पना आहे; पण सामना एक आठवडय़ानंतर हवा होता, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.