बंडखोर टेनिसपटू आणि एआयटीए यांच्यातील वादावर तोडगा निघू न शकल्याने एआयटीएने पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीसाठी दुय्यमस्तरीय संघाची घोषणा केली. एआयटीएने बंडखोर टेनिसपटूंच्या आणखी काही मागण्या मान्य करत गुरुवापर्यंत वाटाघाटीसाठी प्रयत्न केले. मात्र तरीही या आठ टेनिसपटूंनी लढतीसाठी उपलब्ध असल्याचे कळवले नाही.
आमच्या मागण्यांचा विचार करा अन्यथा डेव्हिस चषकावर बहिष्कार टाकू, असा इशारा आठ अव्वल टेनिसपटूंनी दिला. यानंतर एआयटीएने काही मागण्यांची पूर्तता करत खेळाडूंची बोळवण करण्याचा प्रयत्न केला.
टेनिसपटूंना हा प्रस्ताव पसंत पडला नाही आणि ते आपल्या बहिष्कारावर ठाम राहिले. पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीसाठी उपलब्धता देण्याची शुक्रवारी शेवटची तारीख होती. मात्र या आठपैकी कोणीही उपलब्धता न दर्शवल्याने एआयटीएला दुय्यम संघाची निवड करावी लागली.
अनुभवी खेळाडू लिएण्डर पेस या संघाचे नेतृत्व करणार आहे. व्ही. एम. रणजित, विजयंत मलिक आणि पुरव राजा हे या संघातील अन्य खेळाडू आहेत. एकेरीचे खेळाडू असलेला रणजित क्रमवारीत ५१७व्या तर मलिक ५४२व्या स्थानी आहे. दुहेरीचा पुरव राजा क्रमवारीत १५५व्या स्थानी आहे. एस. पी. मिश्रा हे नॉन प्लेइंग कर्णधार असतील तर झिशान अली प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळतील.
विशेष म्हणजे या तिघांपेक्षा क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या एन. श्रीराम आणि राष्ट्रीय विजेता जीवन नेंदुचेझियान यांनीही आपण डेव्हिस चषक लढतीसाठी उपलब्ध नसल्याचे कळवले. यामुळे या दोघांनीही आठ बंडखोर टेनिसपटूंना साथ देण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे.
फिजिओथेरपिस्टच्या नियुक्तीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी चर्चा करण्याऐवजी एआयटीएने खेळाडूंच्या पसंतीला महत्त्व दिले. याशिवाय आशिया-ओश्ॉनिया गटाच्या लढतीसाठी चारही खेळाडूंना बिझनेस क्लासचे हवाई तिकीट दिले जाईल ही मागणीही मान्य केली. परंतु यानंतरही आठ टेनिसपटूंनी खेळण्यास असमर्थता दर्शवली.
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला अंतिम संघाची माहिती देण्यासाठी एआयटीएकडे दहा दिवसांचा वेळ आहे. पण संघात बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे सूतोवाच एआयटीएने दिले आहेत.
निवड समितीचे अध्यक्ष अनिल धुपर यांनी संघ जाहीर करताना संघटनेची भूमिका विशद केली. खेळाडूंचा बहिष्कार अवास्तव आणि अनुचित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. बंडखोर टेनिसपटूंना आशिया खंडातील सर्वोत्तम वेतनाचा पर्याय देण्यात आला. वरिष्ठ खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाचा तपशीलही देण्यात आला. मात्र तरीही टेनिसपटूंनी आडमुठेपणा सोडला नाही, असे त्यांनी पुढे सांगितले.
दरम्यान, शेवटच्या डेव्हिस चषक लढतीत भारताने न्यूझीलंडवर ५-० असा निर्विवाद विजय मिळवला होता. या लढतीत युकी भांब्री, विष्णू वर्धन, दिवीज शरण, सनम सिंग संघाचा भाग होते.