तैपेई : भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयरामने चायनीज तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये डेन्मार्कच्या प्रतिस्पध्र्यावर सरळ दोन गेममध्ये मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

डेन्मार्कच्या किम ब्रुनविरुद्ध जयरामचा हा सामना अवघ्या ३७ मिनिटात संपुष्टात आला. पहिल्या गेममध्ये जयरामने प्रारंभापासूनच आघाडी घेतली. त्यामुळे जयरामला प्रतिस्पध्र्याचे आव्हान सुलभ वाटले. पहिला गेम जयजरामने आरामात २१-१० असा जिंकल्याने जयरामचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत होते. त्यानंतर दुसऱ्या गेमममध्ये किमने जोरदार पुनरागंमन केले. प्रारंभी जयरामने ६-३ अशी आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर किमने आघाडी कमी करीत स्वत:च ११-९ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर ती आघाडी वाढवत १६-१२ पर्यंत नेली. त्यामुळे किम दुसरा गेम जिंकण्याची चिन्हे दिसू लागली. मात्र, जयरामने पुन्हा उसळी घेत गुणांमधील अंतर कमी करीत सामना १९-१९ असा बरोबरीत आणला. अखेरीस अटीतटीच्या लढतीनंतर गेमसह सामना खिशात घातला. जयरामने हा सामना २१-१०, २२-२० असा जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत जयरामचा सामना मलेशियाच्या ली झी जिआ याच्याशी होणार आहे. मात्र दुसरीकडे भारताच्या सौरभ वर्माला जपानच्या रिची ताकेशिता याच्याकडून २१-१९, २१-२३, १६-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. सुरुवातीपासून अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात सौरभने पहिला गेम जिंकून चांगला प्रारंभ केला. दुसरा गेम अत्यंत अटीतटीचा होऊन त्यात सौरभला मात खावी लागली. अखेर तिसऱ्या गेमपर्यंत सामना लांबल्यानंतर रिचीने जबरदस्त मुसंडी मारत तिसऱ्या गेमसह सामना जिंकून घेतला.