अजय जयराम आणि आनंद पवार यांनी प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.  मुख्य फेरीत आगेकूच करण्यासाठी आता या दोघांमध्येच मुकाबला होणार आहे.
अजयने तैपेई संघाच्या तिझु वेई वाँग वर २१-१३, २१-१४ अशी सरळ दोन गेम्समध्ये मात केली. मुंबईकर आनंद पवारने अमेरिकेच्या सॅटवट पौगिनरेटचा २१-१७, २१-११ असा पराभव केला.
भारताच्या डी. गुरुप्रसाद व व्यंकटेश प्रसाद यांना दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या माकरेस किडो व अग्रिपिता रहमांतो यांनी त्यांच्यावर २१-९, २१-११ असा सफाईदार विजय मिळविला. भारताच्या एस. संजीव व जगदीश यादव यांनाही पात्रता फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांना नेदरलँड्सच्या जाको अ‍ॅरेंडस व जेली मास यांनी २१-१६, २१-१० असे हरविले.
गिरीश नातू व उदय साने यांच्याकडे पंचांची जबाबदारी
गिरीश नातू व उदय साने या दोन्ही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय पंचांकडे येथे तांत्रिक अधिकारी व पंच म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नातू यांनी लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले होते.
या दोन्ही पंचांनी आजपर्यंत जागतिक स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पंचांची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.