भारताच्या अजय जयरामला कोरिया सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. अजयच्या पराभवासह स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानी असलेल्या कोरियाच्या ली ह्युनने (दुसरा) अजयवर २५-२३, २१-१३ असा विजय मिळवला. याआधी ह्युनविरुद्धच्या दोन्ही लढतीत अजय पराभूत झाला होता. शुक्रवारी झालेल्या लढतीत विजय मिळवत ह्युनविरुद्धची कामगिरी सुधारण्याची संधी त्याच्याकडे होती. मात्र त्याला अपयश आले.

पहिल्या गेममध्ये अजय एका क्षणी १४-११ असा आघाडीवर होता मात्र ह्युनने सलग सात गुणांसह पारडे फिरवले. ह्युनने २०-१७ अशी दमदार वाटचाल केली मात्र अजयने तीन मॅचपॉइंट वाचवले. मात्र त्यानंतर ह्युनने संधी न दवडता पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये ४-४ अशी बरोबरी होती. मात्र ह्युनने सातत्याने गुण कमावत दुसऱ्या गेमसह सामनाही जिंकला.

श्रीकांत पुन्हा अव्वल दहामध्ये

जपान सुपर सीरिज स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रदर्शनासह किदम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावले आहे. पाच स्थानांनी सुधारणा करत श्रीकांतने नववे स्थान पटकावले आहे. अजय जयरामची नऊ स्थानांनी घसरण होऊन तो आता २७व्या स्थानी आहे. दरम्यान, न खेळताही सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू यांनी क्रमवारीत आगेकूच केली आहे. सायनाने तीन स्थानांनी सुधारणा करीत पाचव्या स्थानी पोहचली आहे तर सिंधूने दोन स्थानांनी सुधारणा करीत आठवे स्थान पटकावले आहे.