समीर वर्मा, रितूपर्णा दासचे आव्हान संपुष्टात

भारताच्या अजय जयरामने नेदरलँड्सच्या मार्क कॅलजॉवचा सरळ गेम्समध्ये पराभव करून जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पध्रेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मात्र समीर वर्मा आणि रितूपर्णा दास यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

पुरुष एकेरीत १३व्या मानांकित जयरामने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करीत जागतिक क्रमवारीत ५०व्या स्थानावरील कॅलजॉवचा ३३ मिनिटांत २१-१३, २१-१८ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असलेल्या जयरामची पुढील फेरीत दोन वेळा विश्वविजेत्या चीनच्या चेन लाँगशी गाठ पडाणर आहे.

सय्यद मोदी गँड्र प्रिक्स गोल्ड स्पर्धा जिंकणाऱ्या समीरची वाटचाल खंडित झाली. २०१०मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत रौप्यपदक विजेत्या राजीव ऑसेफने त्याचा २२-२०, २१-९ अशा फरकाने पराभव केला.

महिला एकेरीत राष्ट्रीय विजेत्या रितूपर्णाला स्कॉटलंडच्या किस्र्टी गिल्मरचा अडथळा ओलांडता आला नाही. १६व्या मानांकित गिल्मरने ४२ मिनिटे रंगलेल्या लढतीत तिचा २१-१६, २१-१३ असा पराभव केला.

महिला दुहेरीत चीनच्या १४व्या मानांकित बाओ यिझिन आणि यू शिओहान जोडीने भारताच्या संजना संतोष आणि आरती सारा सुनीलचा २१-१४, २१-१५ असा पराभव केला.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये सिंधूची एका स्थानाने आगेकूच

नवी दिल्ली : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये एका स्थानाने आगेकूच केली आहे, तर किदम्बी श्रीकांतची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. २२ वर्षीय सिंधू आता चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीकांत १०व्या स्थानावर आहे.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी २४व्या स्थानावर आहेत, तर मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडी २०व्या स्थानावर कायम आहे.

याशिवाय सायना नेहवाल (१६व्या स्थानावर), बी. साईप्रणीत (१९व्या), एच. एस. प्रणॉय (१५व्या) आणि अजय जयराम (१७व्या) यांनी आपले स्थान टिकवले आहे. पुरुष दुहेरीच्या अव्वल २५ जोडय़ांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.