कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेल्या अजय जयरामने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये सात स्थानांची झेप घेत अव्वल २५ खेळाडूंच्या यादीमध्ये प्रवेश केला आहे.
कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जयरामला जगज्जेत्या चीनच्या चेन लाँगकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर या स्पर्धेत त्याने नामांकित खेळाडूंना पराभूत केल्यामुळे त्याला क्रमवारीत २५ वे स्थान मिळाले आहे. या क्रमवारीत के. श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांनी आपले अनुक्रमे पाचवे आणि आठवे स्थान कायम ठेवले आहे. एच. एस. प्रणॉयची एका स्थानाने घसरण झाली असून तो १६ व्या स्थानावर आहे.
महिला एकेरीमध्ये पी.व्ही.सिंधू १३ व्या स्थानी कायम आहे. महिला दुहेरीमध्ये ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी त्यांनी अकरावे स्थान कायम ठेवले आहे. पुरुषांच्या दुहेरीमध्ये मनू अत्री आणि बी. सुमिथ हे १९ व्या स्थानावर आहेत. मिश्र दुहेरीमध्ये एकाही भारतीय जोडीला अव्वल २५ जणांच्या यादीत क्रमांक पटकावता आलेला नाही.