अजय सिंह, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष

तुषार वैती

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारताच्या नऊ बॉक्सिंगपटूंच्या संख्येत आणखी वाढ होण्याची आशा आहे. त्यांना ऑलिम्पिकसाठी सज्ज करण्यासह आम्ही भारतीय बॉक्सिंगला यशोशिखरावर पोहोचवू, असा विश्वास भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह यांनी व्यक्त केला.

ऑलिम्पिक पात्रतेच्या स्पर्धा रद्द होत असल्याने आम्ही नाराज आहोत, असेही सिंह म्हणाले. काही दिवसांपूर्वी गुरुग्राम येथे झालेल्या बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीत अजय सिंह यांनी महाराष्ट्राच्या आशीष शेलार यांचा ३७-२७ असा पाडाव करत सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून येण्याचा मान पटकावला. भारतीय बॉक्सिंगची पुढील वाटचाल, ऑलिम्पिकची तयारी तसेच भविष्यातील योजनांविषयी अजय सिंह यांच्याशी केलेली ही बातचीत-

* महाराष्ट्राच्या आशीष शेलार यांचे तगडे आव्हान असतानाही सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून येण्याचे शिवधनुष्य कसे पेलले?

आम्ही खेळाच्या भल्याकरिता एकत्र आलो आहोत, हे मी अनेकदा नमूद केले आहे. आम्हाला खेळात राजकारण आणायचे नसून खेळाडूंना प्रतिष्ठेच्या स्पर्धा तसेच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासहित या खेळाच्या प्रसारासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. अन्य गोष्टी आमच्यासाठी दुय्यम असतील. बॉक्सिंगपटूंना देशात मान्यता मिळवून देण्याबरोबरच या खेळाच्या देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील भरभराटीसाठी आमचे प्रयत्न कायम सुरू राहतील. आम्ही आतापर्यंत केलेल्या कामाचे प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात उमटले असून गेल्या चार वर्षांपासून घेतलेल्या खडतर परिश्रमाचे फळ आम्हाला मिळाले.

* टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राची रणनीती कशी असेल?

आतापर्यंत टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारताचे विक्रमी संख्येने नऊ बॉक्सिंगपटू पात्र ठरले आहेत. ऑलिम्पिकसाठी सर्वाधिक पात्र ठरलेल्या काही देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. त्यामुळे खेळाडूंच्या सरावात काहीही कमी पडू नये, यासाठी आम्ही कटाक्षाने लक्ष देत आहोत. टाळेबंदीनंतर परवानगी मिळाल्यावर आम्ही भारतीय संघाचे सराव शिबीर आयोजित केले. त्याचबरोबर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा सराव व्हावा, यासाठी परदेश दौऱ्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. भारतात ज्या क्षणी खेळाडूंना सराव करण्याची मुभा नव्हती, तेव्हा त्यांच्यासाठी परदेशातही सरावाची व्यवस्था करण्यात आली. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंसाठी येत्या काही महिन्यांत विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्याची योजना आम्ही आखली आहे.

* महिला बॉक्सिंगसाठी कोणत्या योजना तुम्ही आखल्या आहेत?

गेल्या चार वर्षांत महिला बॉक्सिंगपटूंच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. महिला खेळाडूंनाही अत्याधुनिक सोयीसुविधा तसेच प्रशिक्षण उपलब्ध करून देतानाच त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी आम्ही दिली आहे. त्याचेच फळ आम्हाला मिळाले असून चार महिला बॉक्सिंगपटूंनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान पटकावला आहे. यापुढेही महिला बॉक्सिंगचा प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, जेणेकरून या खेळाकडे अधिकाधिक महिला वळतील, असा विश्वास आहे. त्याचबरोबर महिलांसाठी साहाय्यक प्रशिक्षकांमध्ये डॉक्टर, फिजियो, मानसिक कामगिरीविषयक प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशासनामध्येही महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

* भारताला आणखी काही जागा पटकावण्याची संधी असताना ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीच्या अनेक स्पर्धा रद्द होत आहेत. याविषयी तुमचे मत काय आहे?

ऑलिम्पिकसाठी भारताचा सर्वाधिक संघ जावा, अशी आमची इच्छा आहे, पण करोनासारख्या संकटाच्या काळात सर्व खेळाडू सुरक्षित राहावेत तसेच ही परिस्थिती समजून घेत नव्या आव्हानांवर मात करण्याचे बळ मिळो, हीच सदिच्छा आहे. एक सजग बॉक्सिंग राष्ट्र या नात्याने सर्व खेळाडूंचे आरोग्य सुरक्षित राहावे, हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आतापर्यंत नऊ खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असले तरी ही संख्या नक्कीच वाढेल, असा विश्वास आहे.

* भारतात या वर्षी आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा रंगणार आहे, करोनानंतर देशात होणारी ही पहिलीच मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल, याविषयी तुम्ही कशा प्रकारे पाहात आहात?

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी आमची जय्यत तयारी सुरू आहे. एका वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही स्पर्धा होत असली तरी भारतासाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. आशियातील अव्वल खेळाडूंसोबत दोन हात करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या स्पर्धेच्या ठिकाणाची घोषणा अद्याप झाली नसली तरी स्पर्धेचे ठिकाण ठरल्यानंतर आम्ही पुढच्या तयारीला लागू.