इंग्लंड दौऱ्यावर खेळाडूंना सतत होणाऱ्या दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पुन्हा प्रशिक्षण सुरू केले आहे. तो स्नायूच्या दुखापतीमुळे काऊंटी इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यातही खेळला नव्हता. आता चार ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नॉटिंगहॅम कसोटीपूर्वी त्याने सराव सुरू केला आहे. सध्या टीम इंडिया डरहॅममध्ये आहे. रहाणेने क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीचा सरावही केल्याची माहिती मिळाली आहे.

रहाणेनेच्या डाव्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण आणि सौम्य सूज असल्याने तो काऊंटी इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात अनुपस्थित होता. दुखापतीशी संबंधित सूज आणि वेदना कमी करण्यासाठी त्याला इंजेक्शन्स देखील देण्यात आले होते. मात्र, आता तो सरावास परतल्याने कर्णधार विराट कोहलीला आणि भारतीय संघ व्यवस्थापनेला थोडासा दिलासा मिळाला आहे.

रहाणेची कामगिरी

गेल्या महिन्यात साऊथम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रहाणेने ४९ आणि १५ धावा केल्या होत्या. यंदा इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतही त्याची फलंदाजी संथच राहिली. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो फक्त एकच अर्धशतक ठोकू शकला.

दरम्यान, दुखापतग्रस्त खेळाडूंच्या बदलीसाठी सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ इंग्लंडला रवाना होणार आहेत. रहाणेला बॅक अप म्हणून मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला पाठवले जाईल, अशी शक्यता आहे. पहिल्या कसोटीपूर्वी सूर्यकुमार आणि शॉ इंग्लंडमध्ये पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण हे दोन्ही फलंदाज सध्या श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहेत. त्यात कृणाल पंड्याला करोनाची लागण झाल्यामुळे या दोघांच्या इंग्लंडवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. इंग्लंडला पोहोचल्यानंतर दोघांनाही करोना प्रोटोकॉल अंतर्गत १० दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. त्यानंतरच ते संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकतील.

हेही वाचा – ‘‘मालिकेचा गेम चेंजर!”, करोनाग्रस्त कृणाल पंड्याबाबत नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

जर दुखापतीमुळे रहाणे पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही, तर केएल राहुल ही संघ व्यवस्थापनाची पहिली निवड असेल. तसेच, शुबमन गिल देशात परतल्यानंतर रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार म्हणून मयंक अग्रवालला खेळवणे जवळपास निश्चित झाले आहे.