श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात धर्मशालेच्या मैदानात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी पत्त्यांच्या पानाच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आघाडीच्या फलंदाजीच्या अपयशानंतर अजिंक्य रहाणे संघात असायला हवा होता, या चर्चेला उधाण आले. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला देखील या प्रश्नाला सामोरे जावे लागले.

अजिंक्य रहाणेच्या संघातील स्थानाबद्दल रोहित म्हणाला की, बीसीसीआय निवड समिती अजिंक्य रहाणेला सलामीवीराच्या रुपात पाहते आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान देणे कठीण होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील लक्षवेधी कामगिरीनंतर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने पदार्पण केले. याशिवाय खराब कामगिरीनंतर मनीष पांडेलाही पाचव्या क्रमांकावर पसंती देण्यात आली.

यावर रोहित म्हणाला की, मर्यादित षटकांच्या सामन्यात अजिंक्य रहाणे सलामीचा उत्तम पर्याय आहे. त्याच्या क्रमवारीत बदल करु नये, असे आम्हाला वाटते. त्याच्याकडे आम्ही सलामीचा फलंदाज म्हणून पाहत आहोत. त्यामुळेच सध्याच्या घडीला त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देणे कठीण होते. मागील काही सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी निवड समिती श्रेयस, केदार जाधव आणि मनीष पांडे यांना अधिक संधी देण्यास प्राधान्य देत आहोत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यापूर्वी पहिल्या सामन्यात फलंदाजांना आलेले अपयश चिंताजनक नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. एकदिवसी सामने आणि कसोटी सामने यात तुलना करता येणार नाही, असे तो म्हणाला. यावेळी त्याने बुमराहचे समर्थन केले. बुमराहच्या नो बॉलमुळे सामन्याचे चित्र बदलले नाही. आम्ही फलंदाजीत अपयशी ठरल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला, असे रोहित म्हणाला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४९ धावांची खेळी करणारा उपुल थरंगा बुमराहच्या नो बॉलवर बाद झाला होता.