अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात करत मालिकेत दमदार पुनरागमन केलं आहे. पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात संपूर्ण भारतीय संघ अवघ्या ३६ धावांत माघारी परतला. त्यातच विराट कोहलीचं भारतात परतणं, मोहम्मद शमीला झालेली दुखापत, पृथ्वी शॉचं फॉर्मात नसणं यामुळे भारतीय संघ काहीसा अडचणीत सापडला होता. अजिंक्यने या सर्व परिस्थितीवर मात करत अत्यंत कुशल पद्धतीने संघाचं नेतृत्व करत ऑस्ट्रेलियावर मात केली. पहिल्या डावातील शतकी खेळीसाठी त्याला सामानावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणे चतूर कर्णधार, शास्त्री गुरुजींनी केलं कौतुक

टीम इंडियाचा ज्येष्ठ सहकारी रविचंद्रन आश्विनने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वशैलीचं कौतुक केलंय. “संपूर्ण संघ ३६ वर बाद होणं, ही गोष्ट पचवणं खेळाडू म्हणून खरचं खूप कठीण होतं. भारतात क्रिकेटसाठी लोकं खूप भावनिक आहेत, त्यातच विराट माघारी परतणार होता, ज्यामुळे संघाला खरंच धक्का बसला होता. पण आम्ही यामधून सावरलो. अजिंक्यच्या शांत स्वभावामुळे ड्रेसिंग रुममध्ये आम्हाला आधीचा पराभव विसरुन नव्याने मैदानात उतरुन लढण्याची संधी मिळाली.” आश्विन पीटीआयशी बोलत होता.

अवश्य वाचा – मराठमोळ्या रहाणेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू

दरम्यान, टीम इंडियाने विजय मिळवला असला तरीही संघासमोरील अडचणी काहीकेल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना उमेश यादवला दुखापत झाल्यामुळे त्याला स्कॅनिंग व इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी मैदानाबाहेर नेण्यात आलं. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, “उमेश यादवच्या स्कॅनिंगचे रिपोर्ट आले आहेत. उमेश तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. अखेरच्या कसोटी सामन्यापर्यंत तो दुखापतीपर्यंत सावरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्याआधी बरं व्हायला त्याला फार कमी वेळ आहे”, सूत्रांनी माहिती दिली.