अजिंक्य रहाणेची भूमिका

अजिंक्य रहाणेसारखा तंत्रशुद्ध फलंदाजी भारताला मिळाला आहे. त्याची फलंदाजी पाहताना काही जणांना कधी माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची आठवण येते, तर काही वेळेला ‘द वॉल’ राहुल द्रविडची आठवण आल्यावाचून राहत नाही. पण अजिंक्यला मात्र तसे वाटत नाही. मी कुणाचीही नक्कल करत नाही, माझी फलंदाजीची शैली स्वतंत्र आहे, असे मत अजिंक्यने व्यक्त केले आहे.

‘ सध्याच्या घडीला आयपीएलमधील फलंदाजीबाबत मी समाधानी आहे. मी साध्या-सरळ गोष्टी करण्यावर अधिक भर देतो आणि कसलेही दडपण घेत नाही. मी कुणाचीही नक्कल करत नाही किंवा मला ती करण्याची गरजही भासत नाही. माझी फलंदाजीची शैली ही स्वतंत्र आहे,’ असे अजिंक्य म्हणाला.

सध्याच्या घडीला अजिंक्यचा आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स हा संघ गुणतालिकेत तळाला असून त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. पण अजिंक्यने आतापर्यंत १२७ च्या स्ट्राइक रेटने ४१९ धावा केल्या आहेत.

तो पुढे म्हणाला की, ‘ मी नेहमीच सरळ बॅटने खेळतो. मी जे फटके खेळतो ते क्रिकेटच्यादृष्टीने योग्यच असतात. मी रोज ध्यानसाधना करतो, जेणेकरून माझे खेळावरून लक्ष विचलीत होत नाही. त्यामुळे मला आता फलंदाजीच्या शैलीमध्ये काही करण्याची गरज वाटत नाही.’