बांगलादेशचा दौरा आता  इतिहास झाला आहे, पराभवामधून संघ बरेच काही शिकत असतो. आता माझ्यापुढे ही मालिका जिंकून देऊन देशाला विजयपथावर परतण्याचे ध्येय असेल, असे भारताचा नवनिर्वाचित कर्णधार अजिंक्य रहाणेने झिम्बाब्वे दौऱ्याला जाण्यापूर्वी सांगितले. मंगळवारी भारताचा संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्याला रवाना होत आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.
याला क्रिकेट ऐसे नाव..
बांगलादेशच्या दौऱ्यामध्ये मला  एका सामन्यासाठी वगळण्यात आले होते. पण त्याचे मला वाईट वाटले नाही, मी ते सकारात्मक पद्धतीने घेतले. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला नवीन काहीतरी नक्कीच शिकवत असते. त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यावर खेळ अधिक कसा चांगला करता येईल, याकडे मी अधिक लक्ष देऊ शकलो. माझ्यामते यालाच क्रिकेट ऐसे नाव, म्हणता येईल.
संघातील एकजूट महत्त्वाची
एखादा खेळाडू तुम्हाला दहा  पैकी एखाद दुसरा सामना  जिंकवून देऊ शकतो. पण सर्वच सामने तो जिंकवून देऊ शकत नाही. त्यासाठी संघाची एकजूट महत्त्वाची असते. जर संघ एकत्रितपणे येऊन दमदार कामगिरी करत असेल तर तुम्ही अधिक सामने जिंकू शकता.
प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा
संघातील सारेच खेळाडू महत्त्वाचे असतात. प्रत्येक खेळाडू हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक खेळाडूमध्ये विविधांगी गुणवत्ता असते. त्यामुळे बऱ्याचदा ११ जणांचा संघ निवडणे कठीण होऊन बसते. पण आम्ही नक्कीच समतोल संघ निवडण्याचा प्रयत्न करू.
रणनीती झिम्बाब्वेमध्येच आखणार
मी झिम्बाब्वेचा दौरा केला असून तिथल्या परिस्थितीचा मला अंदाज आहे. पण आता तिथे गेल्यावर आम्हाला सद्यपरिस्थितीचा अंदाज येईल. त्यामुळे तिथे गेल्यावर पहिल्या सामन्यानंतर आम्हाला बरेच काही कळू शकेल. त्यामुळे झिम्बाब्वेमध्येच आम्ही रणनीती आखणार आहोत.
युवा खेळाडूंना चांगली संधी
हा दौरा म्हणजे युवा खेळाडूंसाठी चांगली संधी असेल. या दौऱ्यात चांगली कामगिरी केल्यास त्यांना भारतीय संघात सातत्यपूर्ण राहता येऊ शकते. त्यामुळे या संधीचे युवा खेळाडूंनी सोने करायला हवे. हा दौरा युवा खेळाडूंना बरेच काही शिकवून जाईल.
कर्णधार म्हणून पाहता येईल
आतापर्यंत बऱ्याच कर्णधारांकडून मी बरेच काही शिकलो आहे. पण अजिंक्य रहाणे मैदानात कर्णधारपद कसे भूषवतो, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मैदानात कोणत्या परिस्थितीमध्ये मी कसे निर्णय घेतो आणि त्याचा संघाला कसा फायदा होतो, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे एक कर्णधार म्हणून मी कशी कामगिरी करतो, हे मला पाहता येईल.
फलंदाजी क्रमांकाबाबत नंतर निर्णय
मुंबई, राजस्थान रॉयल्स आणि भारताकडून यापूर्वी खेळताना मी सलामीवीराची जबाबदारी पार पाडली आहे. पण या दौऱ्यात मी सलामीला खेळेन की मधल्या फळीत हे आता सांगता येणे कठीण आहे. मी प्रशिक्षकांसह याबाबत चर्चा करेन आणि संघाला ज्या स्थानावर माझी सर्वाधिक गरज असेल तिथे मी फलंदाजीला येईन.
हरभजनच्या अनुभवाचा फायदा होईल
हरभजन सिंगसारखा अनुभवी खेळाडू संघात आहे, त्याच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच
फायदा होईल. ते एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याने बऱ्याच मेहनतीनंतर संघात पुनरागमन
केले आहे. त्यामुळे त्याबरोबरच संघासाठीही हा दौरा फार महत्वाचा असेल.
नवीन नियम आत्मसात करायला वेळ हवा
नवीन नियम क्रिकेटसाठी जसे आव्हानात्मक आहेत तसेच ते आनंददायी आहेत. त्याबद्दल मला उत्सुकता आहे. नवीन नियमांनुसार आम्हाला रणनीती आखावी लागणार आहे. पण हे नवीन नियम आत्मसात करायला थोडा वेळ लागेल. जसे या नियमांमध्ये आम्ही खेळत जाऊ  तसे हे नियम आमच्या अंगवळणी पडतील.

आव्हान स्वीकारायला आवडतात
कर्णधारपदाची माळ गळ्यात पडणे हा माझ्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. मला आव्हानांचा सामना करायला नेहमीच आवडते, ती स्वीकारायला आवडतात. त्यामुळे ही नवीन जबाबदारी मी माझ्यापरीने समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
बऱ्याच कर्णधारांकडून शिकलो
आतापर्यंत काही कर्णधारांबरोबर खेळताना मला बरेच शिकायला मिळाले आहे. धोनीकडून मी नेतृत्व करताना शांत कसे राहायचे हे शिकत आलो आहे. मैदानावर आपली रणनीती सोप्या पद्धतीने अमलात आणायची असे हे मी राहुल द्रविडकडून शिकलो. स्टीव्हन स्मिथ हा प्रत्येक क्षणाला वेगवेगळे निर्णय घेतो.