करोना विषाणूमुळे सध्या देशभरात चिंतेचं वातावरण आहे. केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत आहेत. तरीही प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमधून करोनाचे रुग्ण सापडत आहेत. आपली सामाजिक जबाबदारी ओळखत देशातील अनेक उद्योगपती, अभिनेते, क्रीडापटू, क्रीडा संस्था मदतकार्यात सहभागी होत आहेत. भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेनेही या कठीण काळात आपलं सामाजिक भान जपलं आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाखांची मदत केली आहे. अजिंक्य रहाणेव्यतिरीक्त सचिन तेंडुलकरनेही करोनाग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. याचसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनही राज्य सरकारच्या मदतीला धावून आली आहे. ५० लाख आर्थिक सहायासोबत गरज पडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी उपलब्ध करुन द्यायला MCA ने तयारी दाखवली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर अजिंक्य भारतात परतला. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सध्या सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. अजिंक्य या काळात आपल्या घरात परिवारासोबत वेळ घालवतो आहे…आयपीएलमध्ये अजिंक्य तेराव्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार होता. मात्र करोना विषाणूमुळे ही स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे.