भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात, पहिल्या दिवसाअखेरीस भारताने ६ गडी गमावत २०३ धावांपर्यंत मजल मारली. उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने केलेल्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या वेस्ट इंडिजचे धडाकेबाज सुरुवात करत भारताच्या आघाडीच्या फळीला झटपट माघारी धाडलं. त्यामुळे समालोचनादरम्यान सुनिल गावसकरांसह अनेक माजी खेळाडूंनी भारताच्या संघनिवडीवर आश्चर्य व्यक्त केलं. रोहित शर्मा आणि रविचंद्रन आश्विनला संघात स्थान न देण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. मात्र अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवसाच्या खेळानंतर, रोहित-अजिंक्यला संघात स्थान न मिळण्याचं कारण सांगितलं आहे.

“आश्विन किंवा रोहितसारख्या खेळाडूंना संघात संधी न मिळणं ही सर्वात कठीण गोष्ट असते, मात्र संघ व्यवस्थापनाला नेहमी सर्वोत्तम संघाबाबत विचार करायचा असतो. अँटीग्वाच्या खेळपट्टीवर व्यवस्थापनाला सहाव्या फलंदाजाची गरज होती जो गोलंदाजीही करु शकतो. याचसाठी जाडेजाला संघात स्थान देण्यात आलं. हनुमा विहारीही चांगली गोलंदाजी करतो. त्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षकांमध्ये याबद्दलची चर्चा झाली होती. रोहित-आश्विनसारख्या खेळाडूंना संघात स्थान न मिळणं ही खरचं दुर्दैवी गोष्ट आहे मात्र संघासाठी हे योग्य होतं.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणे बोलत होता.

अवश्य वाचा – Ind vs WI : आश्विनला संघात स्थान न देण्याच्या निर्णयावर गावसकरांकडून आश्चर्य व्यक्त

पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने, रोहित शर्माला कसोटी संघातही सलामीची संधी मिळावी असं मत व्यक्त केलं होतं. दरम्यान पहिल्या दिवसाच्या सत्रात भारतीय फलंदाजीची पडझड झाल्यानंतर, अजिंक्यने सर्वात प्रथम लोकेश राहुल आणि त्यानंतर हनुमा विहारीसोबत भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज धावसंख्येत किती भर घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : कसोटी मालिकेतही रोहितला सलामीला खेळवा, ‘दादा’चा टीम इंडियाला सल्ला