Catches win Matches ही म्हण क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. अनेकदा उत्तम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर क्रिकेट सामन्यात एखाद्या संघाने सामन्याचं चित्र बदलल्याचं आपण पाहिलं आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ या तरुण खेळाडूंनी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवला. धावा अडवण, कठीण झेल घेणं हे क्षेत्ररक्षकांचं काम मानलं जातं. सध्याच्या भारतीय संघातही रविंद्र जाडेजा, मनिष पांडे, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानले जातात. मात्र भारतीय संघापासून गेली काही वर्ष दूर असलेल्या सुरेश रैनाच्या मते अजिंक्य रहाणेचं झेल पकडण्याचं तंत्र सर्वोत्तम आहे.

“अजिंक्यचं झेलं पकडण्याचं तंत्र सरस आहे. त्याच्यात एक वेगळीच उर्जा आहे, त्याचं शरीर कोणत्याही दिशेला झुकत असं मला वाटतं. तो स्लिपमधला आताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. तो स्टम्पमागून फलंदाजाचा पवित्रा आणि हालचाल ओळखतो. फलंदाज आणि स्लिपमध्ये क्षेत्ररक्षकामधलं अंतर हे फार लांब नसतं, त्यामुळे तुम्ही योग्य अंदाज लावणं हे महत्वाचं असतं.” एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रैना बोलत होता. अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आहे.

भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांनीही याआधी अजिंक्यचं कौतुक केलं होतं. ज्यावेळी अजिंक्य एखादा झेल सोडतो तो माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का असतो असं श्रीधर म्हणाले होते. दरम्यान केंद्र सरकारने मैदानं खुली करण्यास परवानगी दिली असली तरीही मुंबई रेड झोन एरियात येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने अद्याप मुंबईत सरावाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेसोबत रोहित शर्मा या खेळाडूंना सरावासाठी वाट पहावी लागणार आहे.