यजमानांना विजयासाठी ४१९ धावांचे आव्हान; विहारीला शतकाची हुलकावणी

कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने तब्बल दोन वर्षांनंतर साकारलेल्या शतकाच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा डाव ७ बाद ३४३ धावांवर घोषित केला. हनुमा विहारीला (९३) शतकाने हुलकावणी दिली. परंतु यजमानांपुढे भारताने ४१९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.

शनिवारच्या ३ बाद १८५ धावांवरून पुढे खेळताना भारताने कर्णधार विराट कोहलीला लवकर गमावले. कोहली कसोटी कारकीर्दीतील २१वे अर्धशतक झळकावून ५१ धावांवर बाद झाला. रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर जॉन कॅम्पबेलने त्याचा दुसऱ्या प्रयत्नात झेल पकडला.

४ बाद १८७ धावांवरून मात्र रहाणे आणि विहारी यांनी डाव सावरला. दोघांनी पाचव्या गडय़ासाठी १३५ धावांची भागीदारी रचून भारताला तीनशे धावांच्या पलीकडे नेले. पहिल्या डावात ८१ धावा करणाऱ्या रहाणेने कसोटीला साजेशी फलंदाजी करत एकेरी-दुहेरी धावांवर भर देऊन अवघ्या पाच चौकारांच्या सहाय्याने कसोटीतील १०वे शतक साकारले. यापूर्वी ऑगस्ट, २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध रहाणेने शतक झळकावले होते.

परंतु शतक झळकावल्यावर लगेचच १०२ धावांवर तो शेनन गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऋषभ पंतने (७) पुन्हा एकदा निराशा केली. दुसरीकडे विहारीने कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावताना शतकाच्या दिशेने कूच केली. मात्र जेसन होल्डरच्या चेंडूला पूल करण्याच्या प्रयत्नात तो यष्टीरक्षक शाय होपकडे ९३ धावांवर झेल देऊन माघारी परतला. विहारी बाद होताच कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा दुसऱ्या डावात विंडीजची ५ बाद १५धावा अशी बिकट अवस्था झाली होती. इशांत शर्मा व जसप्रीत बुमरा दोघांनीही प्रत्येकी दोन बळी मिळवले होते.

संक्षिप्त धावफलक

  • भारत (पहिला डाव) : २९७
  • वेस्ट इंडिज (पहिला डाव) : २२२
  • भारत (दुसरा डाव) : ११२.३ षटकांत ७ बाद ३४३ डाव घोषित (अजिंक्य रहाणे १०२, हनुमा विहारी ९३, विराट कोहली ५१; रॉस्टन चेस ४/१३२).