क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्याकडून कौतुक
स्लिपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी अजिंक्य रहाणेची ख्याती होऊ लागली आहे. सरावावेळी केलेल्या अथक मेहनतीचे हे फळ आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांनी रहाणेचे कौतुक केले.
‘‘स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि संयम त्याच्याकडे आहे. कठीण झेलही टिपता यावेत यासाठी तो सरावाच्या वेळी प्रचंड मेहनत करतो. त्याचे श्रम विसरता येणार नाहीत. अक्षरश: शंभराहून अधिक झेल टिपण्याचा तो सराव करतो. चेंडू कुठल्या उंचीवर, किती वेगात आणि कुठे झेल हवा, या सर्व निकषांचा विचार करून तो सराव करतो,’’ असे श्रीधर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘चेंडूचा वेग, कोन आणि तो किती प्रमाणात उसळी घेईल याचा त्याचा सखोल अभ्यास आहे. वेगवान आणि फिरकीपटू गोलंदाजांसमोर क्षेत्ररक्षण करताना फरक असतो. अजिंक्य या बदलाशी सहजपणे जुळवून घेतो, म्हणूनच स्लिपमधील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून तो विकसित होतो आहे.’’
‘‘भारतीय संघात सध्या चांगल्या क्षेत्ररक्षकांची फळी तयार झाली आहे. जडेजाचे चापल्य विलक्षण आहे. कोहलीची ऊर्जा चैतन्यमयी आहे. शिखर धवनही चांगला क्षेत्ररक्षक आहे. रोहित तसेच चेतेश्वर हेही मोलाचे योगदान देत आहेत. झेल टिपणे आणि धावा रोखणे या दोन्ही आघाडय़ांवर भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे,’’ अशा शब्दांत युवा भारतीय खेळाडूंची श्रीधर यांनी प्रशंसा केली.