भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा फलंदाज अजिंक्य रहाणे आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. Player Transfer Window अंतर्गत राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये अजिंक्य रहाणेबद्दल बोलणी सुरु आहेत. यासंदर्भात बोलणी सुरु असून, लवकरच निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं.
आयपीएलमध्ये अजिंक्यने आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय वन-डे आणि टी-२० संघात अजिंक्यला स्थान मिळत नसलं तरीही आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळत असताना त्याने सलामीवीराची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये अजिंक्यच्या नावावर दोन शतकांचीही नोंद आहे.
राजस्थान रॉयल्सने अजिंक्यसाठी ४ कोटी रुपये मोजले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्यच्या मोबदल्यात दिल्लीचा पृथ्वी शॉ राजस्थानच्या संघात दाखल केला जाऊ शकतो. २०१९ साली आयपीएल हंगामात मध्यावधीतच अजिंक्यची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करत स्टिव्ह स्मिथकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 14, 2019 2:34 pm