मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केलाय. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सनी दणदणीत पराभव केला आणि बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकाही 2-1 अशा फरकाने खिशात घातली. या सामन्यात मिळवलेल्या दैदिप्यमान विजयासोबतच कर्णधार म्हणूनही रहाणे ‘अजिंक्य’च राहिला.

अजिंक्य रहाणेकडे सर्वप्रथम 2017 मध्ये भारतीय संघाचं कर्णधारपद आलं. ऑस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेसाठी भारतात आला असताना अखेरच्या कसोटी सामन्याआधी विराट कोहली जखमी झाल्यामुळे अजिंक्यकडे भारतीय संघाची धूरा सोपवण्यात आली होती. धर्मशालामध्ये झालेल्या त्या कसोटी सामन्यात रहाणेने 63 धावांची खेळी केली आणि भारताच्या मालिका विजयामध्ये मह्त्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर 2018 मध्ये अफगाणिस्तानचा संघ एका कसोटी सामन्यासाठी भारतात आला होता. त्या भारतीय संघाचं नेतृत्त्वही अजिंक्यने केलं आणि भारताने एक डाव व 262 धावांनी सहज विजय मिळवला. नंतर सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा नियमीत कर्णधार विराट कोहली फक्त एकच सामना खेळला आणि त्याच सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. मात्र त्यानंतर अजिंक्यकडे संघाचं नेतृत्व आलं तेव्हापासून मात्र भारताने एकही सामना गमावला नाही.

आणखी वाचा- ‘गाबा’चं घर खाली! कांगारुंवर ७० वर्षांनी नामुष्की, टीम इंडियाने रचला इतिहास

महेंद्रसिंग धोनी हा भारताचा यशस्वी कर्णधार असल्याचं म्हटलं जातं. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मातीत धोनीलाही जी कामगिरी करता आली नाही ती यावेळी अजिंक्यने करून दाखवली आहे. तसं बघायला गेलं तर 2018-19 सालीही विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवला होता. पण तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या संघात बरेच नवीन चेहरे होते आणि त्यांनी भारताला कडवी झुंज दिली होती. याउलट अजिंक्यच्या नेृत्तवात यावेळी भारताचा जवळपास संपूर्ण संघच दुखापतग्रस्त झाला होता, तरीही अजिंक्य रहाणेने न डगमगता युवा खेळाडूंना साथीला घेऊन संघाची मोट बांधली आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारताने तीन कसोटी सामन्यांमध्ये दोन विजय मिळवले, तर एक अनिर्णीत राखली. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकही पराभव पत्करावा लागलेला नाही.