भारतीय क्रिकेट संघातील मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे हा मैदानात आणि मैदानाबाहेरही कायमच चर्चेत असतो. नव्या वर्षाच्या सुरुवातीला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात झालेली बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका आपल्या नावावर केली. त्यामुळे अजिंक्यच्या नेतृत्वाची बरीच चर्चा झाली. आता त्याचं नाव पुन्हा चर्चेत येण्याचं कारण ठरला आहे, एक जुना व्हिडीओ! रहाणेचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजिंक्यनं भारतीय राष्ट्रध्वजाचा सन्मान करत चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.

सध्या ट्विटरवर अजिंक्यचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याबद्दल निश्चित माहिती नसली, तरी नेटकऱ्यांनी अजिंक्यवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रिकेट स्टेडियममध्ये एका चाहत्यानं अजिंक्यकडे भारताच्या तिरंग्यावर सही करण्यास सांगितलं होतं. अजिंक्यनं त्या चाहत्याला नकार दिला. त्या चाहत्याच्या बाजूला असणाऱ्या इतर प्रेक्षकांनी अजिंक्यला पेपरवर सही मागितली आणि त्याने ती लगेच दिलीही. पण तिरंग्याचा मान राखत अजिंक्यनं सही करण्यास नकार दिल्यानं अनेकांनी त्याला मनोमन सॅल्यूट केला. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी देखील अजिंक्यचं कौतुक झालं होतं. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तीन गड्यांनी कांगारुंचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ ने जिंकली होती. विशेषत: प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आणि पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतरही भारतानं मालिका जिंकण्याचा पराक्रम केल्यामुळे रहाणेसह विजयीवीरांवर चोहोबाजूने कौतुकाचा वर्षाव होत होता. जेव्हा अजिंक्य मायदेशी पोहोचला तेव्हा त्याच्या माटुंगा येथील राहत्या घरी जल्लोषात स्वागत झालं होतं. रहाणेच्या स्वागतासाठी सोसायटीमधील काही लोकांनी केक आणला होता. त्यासाठी कांगारुची प्रतिकृती असलेला केक मागवण्यात आला. कांगारुंचा पराभव केल्यानं केकवर कांगारुची प्रतिकृती साकारण्यात आली. रहाणेला स्वागतानंतर हा केक कापण्याची विनंती करण्यात आली. मात्र रहाणेनं त्यावेळीही खिलाडूवृत्ती दाखवून देत केक कापण्यास नकार दिला होता. त्यावेळी देखील त्याचे कौतुक झाले होते.