भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या संघातील सहकारी अजिंक्य रहाणेवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अजिंक्य हा भारताचा परदेशी खेळपट्टयांवर सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याची पावती विराट कोहलीने दिली आहे. ६ जूनला अजिंक्य रहाणेने आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, हार्दिक पांड्या यांनी अजिंक्यला शुभेच्छा दिला. अफगाणिस्तान कसोटीनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य हा संघाचा महत्वाचा हिस्सा असल्याचे संकेत यावेळी विराट कोहलीने दिले आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे. अजिंक्य रहाणेचा इंग्लंड दौऱ्यातील वन-डे व टी-२० संघात समावेश करण्यात आलेला नाहीये, मात्र कसोटी संघात अजिंक्यवर मोठी जबाबदारी असणार आहे. इंग्लंडविरोधात कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये. मात्र विराट कोहलीने केलेल्या स्तुतीनंतर अजिंक्य रहाणेला संघात जागा मिळणार याची खात्री बाळगायला हरकत नाही.