कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीची अजिंक्य रहाणेची तयारी

नवी दिल्ली : एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा विश्वास भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त के ला आहे. कसोटी फलंदाज रहाणे भारताकडून अखेरचा एकदिवसीय क्रिकेट सामना फेब्रुवारी २०१८ मध्ये खेळला होता.

‘‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. सलामीवीर किंवा चौथ्या स्थानावरही फलंदाजी करण्याची माझी तयारी आहे. माझा अंत:प्रेरणेवर विश्वास असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेन याची खात्री आहे,’’ असे ३२ वर्षीय मुंबईकर फलंदाज रहाणेने सांगितले.

‘‘संधी कधी मिळेल हे सांगता येणार नाही. मात्र तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी मानसिकदृष्टय़ा सज्ज आहे. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे फायद्याचे असते,’’ असे रहाणे म्हणाला. भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवणे हे नेहमीच स्पर्धात्मक असते. एकदिवसीय संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा-शिखर धवन जोडीसह चौथ्या स्थानासाठी श्रेयस अय्यर यांची स्थाने पक्की आहेत. या स्थितीत रहाणेसमोर एकदिवसीय पुनरागमन सोपे नाही.

भारताकडून ६५ कसोटी खेळलेला रहाणे आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटदेखील गेल्या चार वर्षांत खेळलेला नाही. भारताकडून रहाणेने २० ट्वेन्टी-२० लढती खेळल्या असून अखेरची लढत २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली आहे.  ‘‘कोणत्याही अन्य फलंदाजाच्या फटकेबाजी करण्याच्या कौशल्याप्रमाणे मी ट्वेन्टी-२० मध्ये फलंदाजीचे फटके खेळत नाही. ट्वेन्टी-२० मध्ये स्वत:च्या शैलीप्रमाणे फलंदाजी करतो. या क्रिकेटमध्ये सहा षटकांनंतर जर खेळायला उतरलात तर खेळात बदल करणे भाग असते. ट्वेन्टी-२०मध्ये क्रिकेटच्या पुस्तकातील फटक्यांप्रमाणेच फलंदाजी करता येईल असे नाही, असे राहुल द्रविड यांनी सांगितले होते,’’असे रहाणेने म्हटले.

सलामीवीर ते चौथ्या क्रमांकाचा फलंदाज

रहाणेने कारकीर्दीत ९० एकदिवसीय लढती खेळल्या आहेत. त्यात ३ शतके आणि २४ अर्धशतकांसह २९६२ धावांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली लढत त्याची शेवटची एकदिवसीय लढत ठरली. एकदिवसीय लढतीत पदार्पणात सलामीवीर म्हणून रहाणेला पाठवण्यात आले होते. नंतरच्या लढतींमध्ये चौथ्या स्थानाचा फलंदाज म्हणूनही त्याने जबाबदारी सांभाळली.