एका छोट्या विषाणूने सध्या साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. भारतासह जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या होत्या. नुकतीच इंग्लंड-वेस्ट इंडिज पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी खेळवण्यात आली. पण भारतीय संघ मात्र ऑगस्टच्या आधी मैदानात उतरणार नाही, हे BCCIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व भारतीय क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग आपापल्या घरी विश्राम घेत आहेत. अशा कसोटीच्या काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी क्रीडापटू वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत आहेत. क्रिकेटपटू आपल्या घरातील फोटो पोस्ट करत चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवत आहेत.

भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणे याने आपल्या घरातील एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये त्याने स्वत:ला मिळालेल्या टॉफी एका शेल्फमध्ये ठेवल्या आहेत. त्यात विविध आकाराच्या छान ट्रॉफीज आहेत. याच शेल्फमध्ये अजिंक्यची चिमुकलीदेखील एका कप्प्यात बसलेली आहे. तिचा तसा फोटो शेअर करत ‘माझी सर्वात आवडती आणि सर्वोत्तम ट्रॉफी हिच आहे’, असे त्याने लिहिले आहे.

अजिंक्य रहाणे आपली मुलगी आणि कुटुंबीयांसोबत रमला आहे. पण तो क्रिकेटलाही मिस करतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो त्याने चाहत्यांचे मनोरंजन करण्याच्या उद्देशाने नव्हे, तर एक विशेष कारणासाठी पोस्ट केला होता. अजिंक्यने कर्णधार विराट कोहलीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोखाली अजिंक्यने, ‘आम्ही सारे क्रिकेटपटू आता क्रिकेट स्पर्धा किंवा मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहोत’, असे लिहिले होते.