एका छोट्या विषाणूने सध्या साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. भारतासह देशभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. सर्व क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्णचारी वर्ग आपापल्या घरी विश्राम घेत आहे. अशा कसोटीच्या काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी क्रीडापटू वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत आहेत. त्यातील एक म्हणजे जुने फोटो पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी हा ट्रेंड फॉलो केल्याचे दिसत आहे.
असाच एक फोटो मुंबईकर अजिंक्य रहाणेने शेअर केला. पण त्याने हा फोटो चाहत्यांचे मनोरंजन करण्याच्या उद्देशाने नव्हे, तर एक विशेष कारणासाठी पोस्ट केला. कर्णधार विराट कोहलीसोबत असलेल्या या फोटोखाली कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य याने लिहिले की आम्ही सारे क्रिकेटपटू आता क्रिकेट स्पर्धा किंवा मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहोत.
क्रिकेटचे सामने गेले दोन – अडीच महिने बंद आहेत. त्यानंतर आजच (गुरूवारी) ICC ने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर महिन्यात नियोजित करण्यात आला असून ३ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका ३ डिसेंबर २०२० ते ७ जानेवारी २०२१ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. पहिली कसोटी ब्रिसबेनला (३ ते ८ डिसेंबर), दुसरी कसोटी दिवस-रात्र असून ती अडलेड ओव्हलवर (११ ते १५ डिसेंबर), तिसरी कसोटी मेलबर्नला (२६ ते ३० डिसेंबर) तर चौथी कसोटी सिडनीमध्ये (३ ते ७ जानेवारी) रंगणार आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं. याच कारणासाठी BCCI ने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. २०१८-१९ मध्ये खेळवण्यात आलेली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका भारताने २-१ ने जिंकली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 4:52 pm