इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेची भारतीय संघात निवड झाली नाही. कसोटी संघाचा महत्वाचा सदस्य असलेल्या अजिंक्यला वन-डे संघात आपलं स्थान पक्क करता आलेलं नाही. यानंतर अजिंक्य रहाणेने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. हॅम्पशायर संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. एकीकडे भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेसाठी दाखल झालेला असताना, अजिंक्यनेही पहिल्याच काऊंटी सामन्यात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॉटिंगहॅमशायर संघाविरुद्ध खेळताना, अजिंक्यने १९७ चेंडूंमध्ये ११९ धावा केल्या. काऊंटी क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करणारा अजिंक्य तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी ससेक्स संघाकडून खेळताना पियुष चावलाने २००९ साली, एसेक्स संघाकडून खेळताना मुरली विजयने २०१८ साली शतक झळकावलं होतं. शतकी खेळी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत अजिंक्यचं कौतुक केलं. तिसऱ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीआधी अजिंक्य त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

रहाणेच्या शतकी खेळीत १४ चौकारांचा समावेश होता. ६०.४१ च्या स्ट्राईक रेटने अजिंक्यने धावा काढल्या. याच सामन्यात पहिल्या डावात अजिंक्य रहाणे अवघ्या १० धावांवर माघारी परतला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने सर्व कसर भरुन काढत त्याने आपल्या संघाचा डाव सावरला. अजिंक्यच्या खेळीच्या जोरावर हॅम्पशायरने ३३७ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे नॉटिंगहॅमशायरचा संघ यापुढे कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkya rahane scores century on county debut for hampshire
First published on: 22-05-2019 at 22:24 IST