३० मे पासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मधल्या काळात भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीचा तिढा सुटत नसताना, काही चाहत्यांनी अजिंक्य रहाणेला संघात घेण्याची मागणी केली होती. मात्र निवड समितीने विश्वचषकासाठी अजिंक्यच्या नावाचाही विचार केलेला नाहीये. त्यामुळे अजिंक्यने बीसीसीआयकडे काऊंटी क्रिकेट खेळण्याची परवानगी मागितली आहे.

अजिंक्य काऊंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर संघाकडून खेळण्याच्या विचारात आहे. मे, जून आणि जुलैच्या मध्यंतरात काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी म्हणून रहाणेने बीसीसीआयला पत्र पाठवले आहे. शिवाय त्याने एक प्रत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीकलाही पाठवली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही रहाणेला परवानगी न देण्याचं कोणतही कारण नसल्याचं म्हटलंय. विराट आणि पुजाराला आम्ही काऊंटी क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली होती. अजिंक्य विश्वचषक संघाचा सदस्य नाहीये, त्यामुळे आगामी कसोटी सामन्यांमध्ये संघाला अजिंक्यच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो, असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, विजय शंकर, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा