न्यूझीलंडवर वन-डे मालिकेत २-१ अशी मात केल्यानंतर भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. उद्या नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या मालिकेत मुंबईच्या अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करण्यात आलेला नाहीये. या कालावधीत अजिंक्य रहाणे मुंबईकडून रणजी सामना खेळणार आहे. ओडीशाविरुद्ध भुवनेश्वर येथे हा सामना रंगणार आहे.

अवश्य वाचा – अजिंक्य रहाणे रणजी सामना खेळणार, ओडीशाविरुद्ध सामन्यासाठी मुंबईच्या संघात निवड

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजिंक्य रहाणेने या सामन्यात आपण सहभाग घेत असल्याचं जाहीर केलं. सध्या मुंबईचा रणजी संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघाने दोन साखळी सामने खेळले आहेत, हे दोनही सामने अनिर्णित राहिले आहेत. या दोन अनिर्णित सामन्यांमधून मुंबईच्या खात्यात ४ गुण जमा झाले आहेत.

Off to Bhubaneshwar#ranjitrophy

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

दुसरीकडे ओडीशाच्या खात्यात २ गुण जमा झाले आहेत. मुंबईप्रमाणे ओडीशाच्या संघाचेही साखळी फेरीतले दोनही सामने अनिर्णित राहिले आहेत. मात्र, या सामन्यांत ओडीशाला पहिल्या डावात आघाडी घेता आली नव्हती. त्यामुळे ओडीशात्या खात्यात २ गुण जमा आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघात अजिंक्य रहाणेची निवड झालेली असून त्याच्या खांद्यावर भारताच्या उप-कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये रहाणेला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. त्यामुळे रणजी सामन्यांमधला अनुभव अजिंक्य रहाणेला कसा कामी येतो हे पहावं लागणार आहे.