भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याआधी न्यूझीलंडमधील वातावरणाची सवय व्हावी यासाठी अजिंक्यची भारत अ संघातही निवड करण्यात आली आहे. भारत अ संघ न्यूझीलंडमध्ये काही सराव सामने खेळेल. या दौऱ्यावर रवाना होण्याआधी अजिंक्यने आपली पत्नी आणि मुलीसोबत वेळ घालवला.

काही महिन्यांपूर्वीच अजिंक्य आणि राधीकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आर्या असं या मुलीचं नाव आहे. अजिंक्यने पहिल्यांदाच आपल्या लेकीला तिच्या पणजीची म्हणजेच अजिंक्यच्या आजीची भेट घडवून आणली. या भेटीचे अनमोल क्षण अजिंक्यने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी अजिंक्य मुंबईकडून दोन रणजी सामनेही खेळला. मात्र या सामन्यांमध्ये त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. गेले काही महिने अजिंक्यला भारताच्या वन-डे आणि टी-२० संघात स्थान मिळालेलं नाही. मात्र असं असलं तरीही अजिंक्य वन-डे संघात पुनरागमनाबद्दल आशावादी आहे. त्यामुळे आगामी न्यूझीलंड दौऱ्यात अजिंक्य कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.