२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, विंडीज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणेला भारतीय संघात जागा दिली जाईल असा सर्वांनी अंदाज वर्तवला होता. मात्र निवड समितीने अजिंक्यची फक्त कसोटी संघामध्ये निवड केली. या निवडीनंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही आश्चर्य व्यक्त केलं होतं. आता अजिंक्यनेही याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

“तुमच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये काही खेळाडू कायम असावेत, असं अनेकांचं मत आहे आणि ते योग्य आहे. तुमच्यात सातत्य असेल तर खेळाडूला कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याचा आत्मविश्वास मिळतो. आपल्यामागे आपले सहकारी नेहमी आहेत, ही भावना कोणत्याही खेळाडूसाठी महत्वाची असते.” अजिंक्य एका खासगी कार्यक्रमात उपस्थित असताना पत्रकारांशी बोलत होता.

तुम्ही वन-डे किंवा कसोटी क्रिकेट सतत खेळत असाल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळू शकता. मात्र ३-४ महिन्यांचा खंड पडला की तुमची लय बिघ़डू शकते. जो खेळाडू तांत्रिकदृष्ट्या चांगला आहे तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू शकतो. आताच्या पिढीच्या खेळाडूंपेक्षा मी खेळाकडे दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहतो. आजकाल कसोटी क्रिकेटमध्येही चांगली धावगती राखणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असाल, तर तुम्ही वन-डे आणि टी-२० क्रिकेटही चांगलं खेळू शकता, अजिंक्य बोलत होता.

“तुमच्या फलंदाजीचं तंत्र योग्य असलं पाहिजे. तुम्ही टी-२० क्रिकेटमधून कसोटी क्रिकेट खेळायला येणार असाल तर तुम्हाला जळवून घ्यायला थोडं कठीण जातं. माझ्यादृष्टीने सातत्य महत्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या खेळाडूला पाठींबा देत असाल तर तुम्ही त्याला सातत्याने पाठींबा देत रहायला हवा.” अजिंक्य वन-डे संघातील आपल्या स्थानाबद्दल बोलत होता. २०१६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध अजिंक्य रहाणे अखेरची टी-२० तर २०१८ साली आफ्रिकेविरुद्ध अखेरचा वन-डे सामना खेळला होता.