भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने जीममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांची मालिका आणि फ्लोरिडातील दोन ट्वेन्टी-२० सामन्यांनंतर भारतीय संघ मायदेशी दाखल झाला. त्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जोरदार तयारीला लागला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अजिंक्य रहाणे उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. आपल्या दैनंदिन सरावासोबतच रहाणे जीममध्येही वर्कआऊट करतो. जीममधील सकाळच्या वर्कआऊट सेशनचा व्हिडिओ रहाणेने इंस्टाग्रामवर पोस्ट केला.

Morning session done✌️✅

A video posted by Jinx (@ajinkyarahane) on

भारतीय संघाच्या संभाव्य १५ खेळाडूंची यादी बीसीसीआयच्या निवड समितीने सोमवारी जाहीर केली असली तरी अंतिम संघ कसा असेल यासाठी २२ सप्टेंबरची वाट पाहावी लागेल. कानपूरमध्ये २२ सप्टेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. विराट कोहली, रहाणे यांच्यासह मुरली विजय, अश्विन, साहा, शमी आणि अमित मिश्रा यांचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान मिळविण्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याची गरज आहे. सध्या पाकिस्तानचा संघ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. पाकिस्तानच्या संघाने कारकीर्दीत पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीचे अव्वल स्थान गाठले आहे. मिसबाह-उल-हकच्या नेतृत्त्वाखालील संघाने इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी जिंकल्यानंतर पाकिस्तानने क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती.