भारताच्या विश्वचषक संघात जागा न मिळालेल्या अजिंक्य रहाणेने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी अजिंक्यने बीसीसीआयकडे याबद्दल परवानगी मागितली होती. बीसीसीआयकडून परवानगी मिळाल्यानंतर हॅम्पशायर क्रिकेट क्लबने अजिंक्यसोबत आगामी काऊंटी क्रिकेट हंगामासाठी करार केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.

याचसोबत अजिंक्य हॅम्पशायर संघाकडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज एडन मार्क्रमच्या जागी रहाणेला संघात जागा मिळाली आहे. आपल्याला परवानगी दिल्याबद्दल अजिंक्यने बीसीसीआय व हॅम्पशायर संघ प्रशासनाचे आभार मानले आहेत.