देशभरात करोना विषाणूचे रुग्ण आढळायला सुरुवात झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकार सतर्कता बाळगून आहे. महत्वाच्या शहरांमध्ये सर्व वैद्यकीय यंत्रणा दक्ष असुन करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याचसोबत परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात राज्य सरकारतर्फे शाळा-कॉलेजं, मॉल, थिएटर, नाट्यगृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं अशा सुचनाही करण्यात आलेल्या आहेत. करोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अनेक मान्यवर व्यक्ती समोर येत आहेत.

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनेही ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत सर्व चाहत्यांना, सरकारी यंत्रणांना मदत करत, घराबाहेर पडणं टाळा अशी विनंती केली आहे. करोनामुळे सध्या वातवारण तणावाचं आहे, अशा परिस्थितीत नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी असल्याचं अजिंक्यने म्हटलंय.

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा आता १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. याचसोबत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन-डे मालिकाही बीसीसीआयने काहीकाळासाठी रद्द केली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकाता विमानतळावरून दुबईमार्गे स्वदेशी परतला. मायदेशात दाखल झाल्यानंतर या संघाला सुरक्षित अंतर राखून विलगीकरण करून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अवश्य वाचा – Video : नागरिक म्हणून आपली कर्तव्य पार पाडूया, करोनाविरुद्ध लढ्यात सचिनचं आवाहन