भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे हा आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळणारा अजिंक्य हा भारताचा आधारस्तंभ आहे. परंतू वन-डे क्रिकेटमध्ये गेली अनेक वर्ष अजिंक्य रहाणेला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. वन-डे संघात मधल्या फळीत आश्वासक कामगिरी करुनही अजिंक्यचा भारतीय संघासाठी विचार केला गेला नाही. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

“चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याची आकडेवारी चांगली होती. तुम्ही सातत्याने चांगली कामगिरी करताय, ९४ च्या स्ट्राईक रेटने धावा काढत असाल तरीही तुम्हाला संघात संधी न मिळणं अन्यायकारक आहे. अजिंक्यला अचानक वन-डे संघातून बाहेर काढण्यात आलं. ज्याप्रमाणे आपण दुधात पडलेली माशी बाहेर काढतो त्याप्रमाणे अजिंक्यला वागणूक देण्यात आली. माझ्यामते अजिंक्यवर हा अन्याय आहे.” आकाश आपल्या यु-ट्यूब चॅनलवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होता. भारतीय संघ आजही पारंपरिक पद्धतीने खेळतो. इंग्लंडसारखं आपण फटकेबाजी करुन प्रत्येक सामन्यात ३५० धावा करण्याचा प्रयत्न करत नाही. पहिल्यांदा मैदानावर स्थिरावून, भागीदारी करुन भारतीय संघ ३०० धावांचं लक्ष्य पार करतो. मग या परिस्थितीत अजिंक्य रहाणे नक्कीच फायदेशीर असल्याचं आकाश म्हणाला.

चांगली कामगिरी केल्यानंतरही अजिंक्यला संघाबाहेर काढणं माझ्या दृष्टीने योग्य नाही. भारतीय संघात ही गोष्ट योग्य केली जात नाहीये. २०१८ पर्यंत तो चांगली कामगिरी करत होता, माझ्या मते अजिंक्यला पुन्हा एकदा संघात संधी द्यायला हवी, असं आकाश म्हणाला. जुलै २०१५ पासून अजिंक्य वन-डे क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर १० डाव खेळला. या डावांत अजिंक्यने ५१.३७ च्या सरासरीने ४११ धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा ९६ चा आहे. ज्यात ४ अर्धशतकांचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यकाळात भारतीय निवड समिती अजिंक्य रहाणेला वन-डे संघात संधी देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.