युएईत आयपीएलचा तेरावा हंगाम आटपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या सिडनीत क्वारंटाइन होऊन सराव करतो आहे. विराट कोहली या दौऱ्यात पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर माघारी परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला ही रजा मंजूर करण्यात आली आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व कोणी करावं यावरुन अनेक मतमतांतर आहेत. माजी भारतीय खेळाडू इरफान पठाणच्या मते उर्वरित कसोटी सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व करावं. परंतू ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने अजिंक्यच्या नावाला आपली पसंती दर्शवली असून…रोहितची परदेशातली आकडेवारी फारशी आश्वासक नसल्याचं म्हटलं आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळताना झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्माला सुरुवातीला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नव्हतं. परंतू विराटने सुट्टीची मागणी केल्यानंतर आणि सोशल मीडियावर रोहितच्या फिटनेसचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर बीसीसीआयने कसोटी संघात रोहितला स्थान दिलं आहे.