News Flash

अजिंक्य रहाणेचं शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात महत्वपूर्ण – सुनिल गावसकर

पहिल्या डावात रहाणेची ११२ धावांची महत्वपूर्ण खेळी

कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मधल्या फळीत अष्टपैलू रविंद्र जाडेजा यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने ऐतिहासिक मेलबर्न कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने नेतृत्व करताना अजिंक्य रहाणेने कसोटी कारकिर्दीतलं १२ वं शतक झळकावलं. टीम इंडियाचा निम्मा संघ माघारी परतल्यानंतरही अजिंक्यने संयमी खेळी करत मोक्याच्या क्षणी शतकी खेळी केली.

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी अजिंक्यच्या खेळीचं कौतुक केलं आहे. “माझ्या मते अजिंक्य रहाणेचं हे शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात महत्वपूर्ण शतक ठरणार आहे. पहिल्या कसोटीत दारुण पराभवानंतरही आम्ही हार मानणार नाही. हा भारतीय संघ पराभव स्विकारुन दबावाखाली खेळणारा संघ नाही हा महत्वाचा संदेश अजिंक्यच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला दिला.” दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर गावसकर 7 Sports Network शी बोलत होते.

दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ५ बाद २७७ पर्यंत मजल मारलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी सावध सुरुवात केली. रविंद्र जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात एकेरी धाव घेताना संभ्रम निर्माण करत शतकवीर अजिंक्य रहाणेला धावबाद केलं. २२३ चेंडूत १२ चौकारांसह ११२ धावा करुन रहाणे बाद झाला. यानंतर आश्विनच्या सहाय्याने जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

अवश्य वाचा – अर्धशतक पूर्ण करताना जाडेजामुळे शतकवीर रहाणे धावबाद, यानंतर मैदानात घडलं असं काही….

भारताचे अखेरच्या फळीतले फलंदाज थोडीफार झुंज देतील अशी अपेक्षा होती. परंतू स्टार्कने जाडेजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशी आणखी एक महत्वाचा बळी मिळवून दिला. यानंतर इतर फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावून परतणं पसंत केलं. अखेरीस ३२६ धावांवर भारताचा पहिला डाव संपवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. कांगारुंकडून मिचेल स्टार्क आणि नॅथल लियॉनने ३-३, पॅट कमिन्सने २ तर जोश हेजलवूडने १ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 11:25 am

Web Title: ajinkya rahanes hundred is one of the most important in indian cricket history says sunil gavaskar psd 91
Next Stories
1 Video : बुम बुम बुमराह; क्लीन बोल्ड झाला पण स्मिथला कळलंच नाही
2 DRS यंत्रणेबाबत सचिन तेंडुलकरचा ICC ला महत्त्वाचा सल्ला
3 भारताला मोठा धक्का; उमेश यादव दुखापतग्रस्त, अर्ध्यातच सोडलं मैदान
Just Now!
X