आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरलेल्या अजित चंडिला याच्यावर आजीवन, तर हिकेन शहा याच्यावर पाच वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) शिस्तपालन समितीने सोमवारी याबाबतचा अंतिम निर्णय दिला.
दोघांनाही त्यांच्यावरील आरोपांविरोधात लेखी प्रत्युत्तर देण्यासाठी ४ जानेवारीपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर ज्योतिरादित्य सिंधिया आणि निरंजन शाह या तिघांचा समावेश असलेल्या शिस्तपालन समितीच्या आज झालेल्या बैठकीत चंडिला आणि शहाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. यात अजितवर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली, तर हिकेन शहावर पाच वर्षांच्या बंदीचा निर्णय घेण्यात आला.
अजित चंडिलानेच बुकींशी ओळख करुन दिली – हरमित सिंगची कबुली
चंडिलाला २०१३ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना संघसहकारी श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांच्या साथीने स्पॉटफिक्सिंग केल्याचा या तिघांवर आरोप होता. श्रीशांत आणि अंकित या दोघांना बीसीसीआयने यापूर्वीच आजीवन बंदीची शिक्षा ठोठावली आहे.