मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार खो-खोला ‘खो’ देऊन कबड्डीच्या मैदानात ‘चढाई’साठी सज्ज झाले आहेत. राज्यात २७ मे या दिवशी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पवार पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार हे जरी पक्के मानले जात असले तरी याकरिता त्यांना महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा त्याग करावा लागणार आहे.

शरद पवार यांनी २८ वर्षे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. मात्र कबड्डी, खो-खोप्रमाणेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवरही शरद पवार यांचा क्रीडा क्षेत्रातील नेतृत्वाचा वारसा अजित पवार यांच्याकडे चालत आला. पण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याकडे एकाच संघटनेचे पद असणे बंधनकारक होते. त्यामुळे २०१३मध्ये अजित पवार यांनी राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा त्याग केला आणि खो-खोचे अध्यक्षपद मात्र कायम ठेवले होते. त्यानंतर त्यांच्या विश्वासू संघटकांकडे व्यक्तींकडेच राज्य कबड्डीची सूत्रे होती. परंतु आता पुन्हा त्यांनी राज्य कबड्डीच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

२००६मध्ये अजित पवार यांनी राज्य खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. तेव्हापासून आतापर्यंत तीन कार्यकाळ म्हणजे २००६ ते २०१०, २०१० ते २०१४ आणि २०१४ ते २०१८ या कालखंडात १२ वर्षे अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. राज्य खो-खो असोसिएशनची निवडणूक ऑगस्ट किंवा सप्टेंबपर्यंत होणार आहेत. त्यामुळे पवार यांचा कार्यकाळ तसा संपतच आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक २७ तारखेला होईल. त्या दिवशी अजित पवार राज्य खो-खोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. मग निवडणूक होईपर्यंत प्रभारी अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली कारभार चालवण्यात येईल. घटनेनुसार वरिष्ठ उपाध्यक्षाला हे पद देता येते.’’

सातारा मात्र निवडणुकीबाहेर

सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचा वाद गेली अनेक वर्षे न्यायालयात सुरू आहे. यासंदर्भात निकाल लागेपर्यंत कोणत्याही गटाला राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मतदाराचा अधिकार देऊ नये, अशा आशयाची याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ते मान्य केल्यामुळे साताऱ्याला निवडणुकीबाहेर राहण्याची नामुष्की ओढवली आहे.

‘मतदारपदा’साठी चढाओढ

जिल्हानिहाय मतदारांची (नामनिर्देशित तीन प्रतिनिधी) नावे स्वीकारण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपणार आहे. या पाश्र्वभूमीवर विविध जिल्ह्य़ांमध्ये नामनिर्देशित प्रतिनिधी म्हणून स्थान मिळवण्यासाठीचे राजकारण तेजीत आहे. मुंबई आणि पुणे जिल्ह्य़ांनी ही नावे ठरवण्याचा सर्वाधिकार आपल्या अध्यक्षांना म्हणजेच अनुक्रमे भाई जगताप आणि अजित पवार यांना दिला आहे. त्यानुसार मुंबईतून जगताप, विश्वास मोरे आणि मनोहर इंदुलकर यांची नावे निश्चित मानली जात आहेत. पुण्यातून पवार आणि महेश लांडगे या दोघांची नावे नक्की असून तिसऱ्या स्थानासाठी शांताराम जाधव आणि शकुंतला खटावकर या अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. या परिस्थितीत बाबूराव चांदोरे यांनी अन्य जिल्ह्य़ांतून आपले मतदार म्हणून स्थान टिकवण्याची चिन्हे आहेत. मुंबई उपनगरातून अध्यक्ष गजानन कीर्तिकर, रमेश हरयाण आणि प्रताप शिंदे या तिघांच्या नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकेल. ठाण्यातून देवराम भोईर, मनोज पाटील आणि शशिकांत ठाकूर तसेच रत्नागिरीतून रवींद्र देसाई, सचिन कदम आणि प्रशांत सुर्वे यांची नावे अगदी निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.